विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्रापाठोपाठ ‘एम्स’ही औरंगाबादेतच आणू : भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 12:48 PM2021-11-01T12:48:10+5:302021-11-01T12:49:36+5:30

Bhagwat Karad: घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होईल, असे प्रयत्न सुरू आहेत.

Let's bring AIIMS to Aurangabad after the Divisional Geriatrics Center: Bhagwat Karad | विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्रापाठोपाठ ‘एम्स’ही औरंगाबादेतच आणू : भागवत कराड

विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्रापाठोपाठ ‘एम्स’ही औरंगाबादेतच आणू : भागवत कराड

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रस्तावित विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्राची फाइल अर्थ खात्याकडे आलेली आहे. ही फाइल लवकरात लवकर मंजूर केली जाईल. मराठवाड्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) होण्यासाठी (Let's bring AIIMS to Aurangabad)  प्रयत्न आहे. आता आयुर्वेदच्या ‘एम्स’चीही मागणी होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात, विशेषत: औरंगाबादेत ‘एम्स’ होण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) म्हणाले.

इंडियन मेडिकल असोसिएशनची औरंगाबाद शाखा आणि घाटीतील वार्धक्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थनगर येथील आयएम हाॅलमध्ये आयोजित ‘जेरिकॉन-२०२१’ या राज्यस्तरीय परिषदेचे रविवारी डाॅ. कराड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ‘आयएमए’चे राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, संयोजन अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, संयोजन सचिव डॉ. यशवंत गाडे, घाटीतील वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख तथा संयोजन कार्याध्यक्षा डॉ. मंगला बोरकर, सायंटिफिक चेअरमन डॉ. अनुपम टाकळकर, डाॅ. रवींद्र कुटे, डाॅ. संजीव इंदूरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

डाॅ. कराड म्हणाले, वार्धक्यशास्त्रात संशोधन केले पाहिजे; पण झालेले संशोधन उपयोगातही आले पाहिजे. संचालन डाॅ. उज्ज्वला दहिफळे यांनी केले. उद्घाटनापूर्वी डाॅ. कुलदीपसिंग राऊळ आणि डाॅ. राजेंद्र गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ऑफलाइन आणि ऑनलाइन सत्र झाले. यात सहभागी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होईल उद्घाटन
घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होईल, असे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री शहरात आले तर ‘एम्स’ची मागणी पूर्ण होण्यास मदत होईल, असे डाॅ. कराड म्हणाले.

Web Title: Let's bring AIIMS to Aurangabad after the Divisional Geriatrics Center: Bhagwat Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.