औरंगाबादकर चला, जोडूया रक्ताचं नातं, रक्तदान करून देऊ या रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:04 AM2021-06-22T04:04:17+5:302021-06-22T04:04:17+5:30
औरंगाबाद : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या ...
औरंगाबाद : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनी, २ जुलैपासून राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवदान देण्याबरोबर रक्ताचं नातं जोडता येणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेतही लाॅकडाऊन आणि निर्बंध लावण्याची वेळ ओढवली. या सगळ्याचा परिणाम रक्तसंकलनावर झाला. ज्या प्रमाणात रक्ताची गरज आहे, तेवढ्या प्रमाणात रक्त उपलब्ध होत नसल्याने गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी भटकंती करावी लागत आहे. निर्बंध उठल्याने आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे; पण रक्ताची टंचाई कायम आहे. ही टंचाई दूर होण्यासाठी ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था यासह अशा प्रत्येक संस्थांना, अधिकारी-कर्मचारी, प्रत्येक औरंगाबादकरांना सहभागी होऊन रक्तदान करता येणार आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेप्रसंगी रुग्णांना, थॅलेसेमियाग्रस्त बालके अशा अनेकांना तातडीने रक्त उपलब्ध होणे आवश्यक असते. रक्ताअभावी कोणाचाही श्वास थांबता कामा नये. यासाठी नागरिकांनी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा दूर करावा, गरजू रुग्णांना जीवदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लसी घेतली, तरी करा बिनधास्त रक्तदान
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. त्यामुळे कोणतेही गैरसमज, भीती न बाळगता रक्तदान केले पाहिजे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान म्हणजे जीवनदान म्हटले जाते.