अशीही ‘आयडिया’; चला, चार्टरने चला...मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला !
By संतोष हिरेमठ | Updated: April 18, 2023 13:41 IST2023-04-18T13:40:59+5:302023-04-18T13:41:15+5:30
मुंबईसाठी सायंकाळी विमानसेवा नसल्याचा परिणाम, लोकप्रतिनिधींनी घेतला चार्टरचा आधार

अशीही ‘आयडिया’; चला, चार्टरने चला...मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला !
छत्रपती संभाजीनगर : कोणाला मुंबईहून सायंकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगरला यायचे आहे का, चार्टर विमान जाणार आहे, अशी ‘आयडिया’ चार्टर विमानसेवा देणाऱ्या कंपन्या करीत आहे. एका मंत्र्यांसाठी मुंबईहून रविवारी रात्री रिकाम्या येणाऱ्या चार्टर विमानाने छत्रपती संभाजीनगरला येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांचा सोशल मीडियावरून शोध घेण्यात आला.
इंडिगोने काही दिवसांपूर्वीच सायंकाळची मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा बंद केली. त्यामुळे केवळ सकाळच्या वेळेतच मुंबई विमानसेवेचा पर्याय उरला आहे. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवाच नसल्याने प्रवाशांसह लोकप्रतिनिधींनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगरहून एका मंत्र्यांना रविवारी मुंबईला जाण्यासाठी चार्टर विमान घ्यावे लागले. हे चार्टर विमान मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला दाखल होणार होते. मंत्र्यांसाठी विमान मुंबईहून रिकामेच येणार होते. त्यामुळे मुंबईहून- छत्रपती संभाजीनगरसाठी सेवा उपलब्ध असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींकडून सामाजिक माध्यमांवर सांगण्यात आले. यानिमित्ताने सायंकाळच्या विमानसेवेसाठी चार्टर सेवेचाही पर्याय पुढे आल्याचे दिसते.
सात सीटर चार्टरचे भाडे किती?
७ सीटर चार्टर विमानाचे एका तासासाठी जवळपास सव्वालाख ते दीड लाखांपर्यंत भाडे आकारण्यात येते. अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक सायंकाळी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला आणि शहरातून मुंबईला जाण्यासाठी चार्टर विमानाचा आधार घेत आहेत.
शहरात चार्टर कंपन्यांचे कार्यालय
शहरात चार्टर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचे कार्यालयदेखील आता पहायला मिळत आहे. चार्टर विमानाबरोबर हेलिकाॅप्टरचाही पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. तिरुपतीसाठीही चार्टर विमानाची विचारणा होत असल्याचे या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.