'चला, ५५० रुपयांत पुण्यात'; प्रवाशांची पळवापळवी, बसस्थानकाच्या जोरावर एजंटांची दिवाळी
By संतोष हिरेमठ | Published: November 14, 2023 11:35 AM2023-11-14T11:35:45+5:302023-11-14T11:40:02+5:30
सुरक्षारक्षक नावालाच; मध्यवर्ती बसस्थानकात चौकशी कक्षासमोरच उभे राहून एजंटांकडून प्रवाशांची पळवापळवी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘साहेब, फक्त ५५० रुपये द्या. चारचाकीत बसा आणि साडेतीन तासांत पुण्यात पोहोचा. वाटले तर एसी कारही मिळेल,’ असे म्हणत खासगी वाहतूकदारांच्या एजंटांकडून बसस्थानकात घुसून ‘एसटी’च्या प्रवाशांची पळवापळवी सुरू आहे. बसस्थानकातील सुरक्षारक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.
दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने सध्या मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक भरून जात आहे. एखादी बस येत नाही तोच काही मिनिटांत भरून जात आहे. बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना काहीसे ताटकळावे लागते. याच परिस्थितीची संधी साधून खासगी वाहतूकदारांचे एजंट एसटीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बसस्थानकाबाहेर नेण्याचा ‘उद्योग’ करीत आहेत.
गस्त, तरीही...
‘पुना है क्या’, ‘नाशिक है क्या’, ‘चलो जळगाव,’ असे म्हणत एजंट प्रवाशांच्या मागे फिरत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षारक्षक गस्त घालतात. मात्र, अगदी त्यांच्या नजरेसमोर प्रवाशांना पळविण्याची किमया एजंट करीत आहेत. सुरक्षारक्षक केवळ नावालाच गस्त घालत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
२०० मीटरचा नियम कागदावरच
बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने नसावीत, असा नियम आहे. तरीही खासगी वाहने बसस्थानक परिसरात आणून बिनधास्तपणे प्रवासी घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे. बसस्थानकाच्या दुतर्फा एजंटांचे घोळके, चारचाकी वाहने दिसून येतात.
जबाबदारी निश्चित केली जाईल
याबाबत संबंधित आगारप्रमुख हे चौकशी करून जबाबदारी निश्चित करतील, असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले.