चला लगीनघाई करा, आजपासून चार दिवसांत उडवा तुळशी विवाहाचा बार
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 24, 2023 07:38 PM2023-11-24T19:38:04+5:302023-11-24T19:40:10+5:30
तुळशी विवाहासाठी चार दिवस मुहूर्त असून त्यानंतर लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांना कधी एकदा तुळशीचा विवाह लागतो आणि आमचा लग्नाचा दिवस कधी उजाडतो, अशी लगीनघाई झाली आहे. तुळशी विवाहासाठी चार दिवस मुहूर्त असून त्यानंतर लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे.
दरवर्षी परंपरेप्रमाणे यंदा लग्नसराईला २८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. ज्यांच्या अंगणात, बाल्कनीत, गच्चीवर तुळशीवृंदावन आहे, त्या त्या घरात तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशी विवाह द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान लावता येणार आहे. या चार दिवसांपैकी एका दिवशी आपल्या सोयीनुसार सायंकाळी तुळशीचा विवाह लावण्यात यावा, असे पंचांगकर्त्यांनी नमूद केले आहे.
कार्तिक स्वामींचे दर्शन दोन दिवस
कार्तिक स्वामींचे दर्शन हे कृतिका नक्षत्रावर घेतले जाते. कृतिका नक्षत्र रविवारी २६ नोव्हेंबरला दुपारी २ वाजेनंतर लागणार आहे. त्यादिवशी त्रिपुरारी पौर्णिमा तर सोमवारी कार्तिकी पौर्णिमा आहे. २७ ला दुपारी १.३५ वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. यामुळे यंदा भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन सलग दोन दिवस घेण्याची भाविकांसाठी पर्वणीच आहे.
- प्रवीण कुलकर्णी गुरुजी
तुळशी वृंदावन, गेरूचा रंग, ऊस, पूजेचे साहित्य
तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी तुळशी वृंदावनाची खरेदी केली जात आहे. अनेक जण आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाला गेरूचा रंग लावत आहेत. बाजारात ऊसही आला आहे. तसेच पूजेचे अन्य साहित्यही खरेदी केले जात आहे. विशेषत: महिला यासाठी पुढाकार घेत आहेत.