जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 06:50 PM2024-10-18T18:50:59+5:302024-10-18T18:52:01+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली उमेदवारीच वैध

Let's try to reduce Jaranges' anger against BJP and Devendra Fadanavis: Sanjay Shirsat | जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट

जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील असलेला राग कमी करण्यासाठी आमचे नेते त्यांची भेट घेऊन प्रयत्न करणार आहोत, जरांगे यांच्या वादावर तोडगा निघेल असा विश्वास शिवसेना प्रवक्ता तथा सिडकोचे अध्यक्ष आ. संजय शिरसाट यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याचा फटका महायुतीला बसला होता. ही बाब लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी महायुती उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहिर होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

आ. शिरसाट म्हणाले की, भाजपची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल. तर शिंदे गटाची यादी दोन दिवसांनी जाहीर होणार आहे. त्यानंतर अजित पवार गटही जाहीर करतील. महायुती नेत्यांचे दौरे ठरले असून, प्रत्येकांना जबाबदारी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील हे महायुतीतील केवळ भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका करीत आहे, तुम्ही त्यांच्यावर कोणती जादूची कांडी फिरवली असा प्रश्न विचारला असता आ. शिरसाट म्हणाले की, आम्ही कोणतीही जादूची कांडी फिरवली नाही, कोणते खोटे आश्वासन दिले नाही, दिलेल्या आश्वासन पाळण्याचा प्रयत्न केला. कुणबी प्रमाणपत्र दिले , सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यावर कोणत्याही समाजाचा रोष नाही. जरांगे यांचा राग शमविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यांना पक्षाने तिकीट नाकारले ते सर्वजण मातोश्रीवर तिकिटासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय झालेला असल्याने पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले महामंडळे अधिकृत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली उमेदवारीच वैध
मंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीमधून किशोर बलांडे यांची उमेदवारी जाहिर केली. शिवसेना खरेच फुलंब्रीतून लढणार आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना आ. शिरसाट म्हणाले, सत्तार यांनी उमेदवारी का जाहिर केली हे मला माहित नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत अधिकृत उमेदवार होत नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात सत्तार यांना फटकारले.

Web Title: Let's try to reduce Jaranges' anger against BJP and Devendra Fadanavis: Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.