चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:32 PM2022-08-09T13:32:39+5:302022-08-09T13:33:48+5:30
पाच मंत्र्यांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल
औरंगाबाद: शिंदे सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्रातील दोन आणि राज्यातील तीन अशी पाच मंत्रिपदे माझ्या जिल्ह्यात आहेत. यामुळे माझ्या जिल्ह्याला आणि मराठवाड्याला 'अच्छे दिन' येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपच्या एकूण १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात जिल्ह्यातून शिंदे गटातील संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपकडून अतुल सावे यांचा समावेश आहे. दरम्यान, खासदार जलील यांनी ट्विट करून सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा विकासाचा अनुशेष दूर करण्याचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असेही जलील म्हणाले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे तर राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे अशी पाच मंत्री माझ्या जिल्ह्यात आहेत. यामुळे जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल, अशी आशा जलील यांनी व्यक्त केली.
''आता औरंगाबादला पाच मंत्री आहेत - 2 केंद्रीय मंत्री (डॉ. भागवत कराड आणि श्री. रावसाहेब दानवे) आणि 3 राज्य कॅबिनेट मंत्री (श्री. अब्दुल सत्तार, श्री. संदीपान भुमरे आणि श्री. अतुल सावे) आपल्या सर्वांकडून माझ्या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल अशी आशा करूया. माझ्या जिल्हयाला 'अच्छे दिन' बघायला मिळेल, अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. हा अनुशेष दूर करण्याचा औरंगाबादचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. सर्व नवीन मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा !''
- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद