फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकल्यावरून औरंगाबादेत पत्रकारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:35 PM2018-10-07T23:35:39+5:302018-10-07T23:36:17+5:30
फेसबुकवर ब्राह्मण महिलांविषयी अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी शहरातील एका दैनिकाच्या पत्रकाराविरुद्ध रविवारी दुपारी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.
औरंगाबाद : फेसबुकवर ब्राह्मण महिलांविषयी अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी शहरातील एका दैनिकाच्या पत्रकाराविरुद्ध रविवारी दुपारी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.
सुरेश पाटील असे गुन्हा नोंद झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ते शहरातील एका दैनिकात वृत्तसंपादक आहेत. मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमाला असलेल्या कवी मनवर यांची कविता सध्या समाज माध्यमावर धुमाकूळ घालते आहे. त्या कवितेत आदिवासी मुलीविषयी रेखाटलेल्या ओळीमध्ये पाटील यांनी आदिवासी हा शब्द वगळून ब्राह्मण हा शब्द घातला आहे. दोन दिवसापूर्वी ही पोस्ट फेसबुकव झळकली व त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला.
पोलिसांनी सांगितले की, ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया प्रवीण कुलकर्णी, उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या महिला संघटक विजया अवस्थी, राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळ, विप्र महिला समाज, आद्य गौड महिला मंडळाच्या सदस्यांनी रविवारी दुपारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सुरेश पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, फेसबुकवर सुरेश पाटील यांनी टाक लेल्या बीभत्स पोस्टमुळे ब्राह्मण महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी विजया कुलकर्णी यांची स्वतंत्र फिर्याद नोंदवून घेत पाटीलविरुद्ध भादंवि कलम २९४ आणि आय.टी. अॅक्टच्या कलम ६७ अन्वये गुन्ह्याची नोंद केली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे तपास करीत आहे.
शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणार
ब्राह्मण महिला मंच, उत्तरदेशीय ब्राह्मण महिला मंडळ, ब्राह्मण गौड समाज महिला मंडळ आणि राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळांचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटून निवेदन देणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.