बालाजी धामच्या दरबारात १६ जणांच्या लिहिल्या चिठ्ठ्या; महाराजांनी ‘माइक’ बंद करून सांगितले...
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 8, 2023 12:46 PM2023-11-08T12:46:13+5:302023-11-08T12:47:40+5:30
भाविकांमधून बोलावले तरुणीला; सांगितले, एक जण तुझी बदनामी करतोय
छत्रपती संभाजीनगर : पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी दुसऱ्या रांगेतील एका तरुणीला बोलावले... ती धर्मपीठावर येण्याआधीच तिची चिठ्ठी लिहून ठेवली होती... तिला सांगितले की, तुला एक जण बदनाम करीत आहे.’ हे ऐकून त्या तरुणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एक तरुणाला बोलावून ... तुझे पहिले लग्न मोडले, आता दुसरे लग्न कोणत्या तारखेला होईल व त्याच्या भावी पत्नीचे नाव काय आहे हेही जाहीर केले.... अशा १६ जणांच्या चिठ्ठ्या महाराजांनी लिहिल्या... महाराज सर्वांच्या ‘मन की बात’ ते कशी ओळखतात हे पाहून अनेक जण भारावले.
सकल हिंदू जनजागरण समितीकडून आयोजित व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड निमंत्रित पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धी प्राप्तीचा दावा करणाऱ्या महाराजांबद्दल मोठी उत्सुकता जनमानसात आहे. त्यांच्या ‘बालाजी धाम सरकार’चा भव्य दरबार मंगळवारी भरविण्यात आला.
दरबारात चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात होताच शिवम नावाच्या व्यक्तीला महाराजांनी आवाज दिला. त्याची समस्या व त्यावर उपाय लिहून दिला. नंतर पगडीधारी पिळदार मिशा असलेल्या वृद्धाची चिठ्ठी निघाली. त्यांच्या घरात मुलांमध्ये सुरू असलेला विवाद व त्यावर उपाय महाराजांनी सांगितला.
पाठीमागे गळ्यात दुपट्टा घातलेल्या तरुणाचे नाव पुकारले. तो धर्मपीठावर येताच त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे, हे सांगितले, तेव्हा तो चकित झाला. काही दाम्पत्यांना बोलावून त्यांचे दुखणे काय, हे सांगितले तर ‘माइक’ बंद करून काही जणांना खासगीत सल्ला दिला. यावेळी मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन कराड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महावीर पाटणी, शीख समाज, सिंधी समाजाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
चमत्कार, अंधश्रद्धा नव्हे सिद्धीप्राप्ती...
महाराजांनी सांगितले की, हा चमत्कार, अंधश्रद्धा नाही, सनातन धर्मात अशा सिद्धी आहेत, त्या मी तपस्येतून प्राप्त केल्या आहेत.
वाल्मीकी ऋषींनी आधी ‘रामायण’ लिहून ठेवले
रावणाचा नाश करण्यासाठी श्रीराम अवतार घेईल, हे वाल्मीकी ऋषींनी आधीच ‘रामायणा’त लिहून ठेवले होते. माझ्या आजोबांचे गुरू, नंतर आजोबांनी असे दरबार भरविले होते. आता मी भरवत आहे, असे महाराजांनी सांगितले.
पुन्हा जानेवारीत दरबार
महाराजांनी सागितले की, मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरात येईन. ६ ते ८ जानेवारी २०२४ ला दरबार भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
आज समारोप
बुधवारी कथेचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३.३० वाजता हनुमान कथेला सुरुवात होऊन सायंकाळी समारोप होईल.