छत्रपती संभाजीनगरात एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर उभारणार: भागवत कराड
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 22, 2023 01:11 PM2023-11-22T13:11:14+5:302023-11-22T13:11:46+5:30
महामेळाव्यात एलआयसीच्या ५०० एजंटांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर : शहरात ‘एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर’ सुरू करणार असल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांना जीवन विमा कवच देणाऱ्या नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या मेळाव्यात एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, व्यवस्थापकीय संचालक एम. जगन्नाथ, विभागीय व्यवस्थापक कमल कुमार, मार्केटिंग व्यवस्थापक अरविंद शिंधू, संजय रामधेर यांची प्रमुख उपस्थिती होती. वंदे मातरम् सभागृह एलआयसी एजंटांनी खचाखच भरून गेले होते. संपूर्ण मराठवाडा, नगर जिल्ह्यांतून एजंट आले होते.
कराड म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर असून ती तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात चांगले काम होणे अपेक्षित आहे. मराठवाड्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाने व्याप्ती वाढवावी. ज्या ठिकाणी एलआयसीच्या मालकीच्या इमारती नाहीत, तिथे इमारती उभ्या करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले. चांगले काम करणाऱ्या ५०० पेक्षा अधिक एजंट, विकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड, अमरावती, पुणे, नाशिक मंडळातील एजंट, विकास अधिकारी, एलआयसीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ऑल इंडिया लिआफीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ग्राहकांच्या गरजेनुसार एलआयसी योजना राबविणार
एलआयसीच्या विविध योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यावर आपला भर असणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित विविध योजना, डिजिटल व्यवहार, दर्जेदार सेवा, कागदविरहित कामकाज व ग्राहकांच्या गरजेप्रमाणे योजना राबविण्यासाठी एलआयसीच्या कामकाजात सर्वाेच्च प्राधान्य देत आहोत.
- सिद्धार्थ मोहंती, अध्यक्ष, एलआयसी