'लायसन टू ड्रिंक'; उत्पादन शुल्क विभागाने दिले आजीवन मद्य पिण्याचे 'लायसन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:36 AM2019-12-27T11:36:47+5:302019-12-27T11:50:55+5:30
काय सांगता ! रांगेत उभे राहून अडीचशे जणांनी मिळविला आजीवन मद्य पिण्याचा परवाना
औरंगाबाद : दारू पिणे शरीरास हानिकारक आहे, असे वारंवार सांगितले जाते. एवढेच नव्हे अनेक वर्षे प्रत्येक जिल्हास्तरावर दारूबंदी कार्यालय कार्यान्वित होते. आता मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने चक्क एक शिबीर घेऊन गुरुवारी मद्यपींना दारू पिण्याचा आजीवन परवाना वाटप केला. विशेष म्हणजे या शिबिरासंबंधी कोणतीही जाहिरात न करता अडीचशे मद्यपींनी रांगेत उभे राहून १ हजार ५ रुपये शुल्क जमा केले आणि हा परवाना घेतल्याचे समोर आले.
राज्याची तिजोरी भरण्याचे काम करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातर्फे मुकुंदवाडी बसस्थांब्याजवळील एका हॉटेलमध्ये मद्य पिण्याचा आजीवन परवाना वाटप करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ ते ४ या कालावधीत शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी कोणतीही जाहिरात करण्यात आली नव्हती. मात्र, या शिबिराची माहिती सोशल मीडियातून वाईन शॉप, बीअर बारचालकांच्या ग्रुपवर देण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच शहरातील सुमारे २५० मद्यपींनी परवान्यासाठी शिबिरात सहभाग नोंदविला. कागदपत्रांची पूर्तता आणि १ हजार ५ रुपये शुल्क जमा क रणाऱ्या २५० नागरिकांना देशी, विदेशी मद्य पिण्याचा आजीवन परवाना देण्यात आला.
विशेष म्हणजे अशा प्रकारे मद्य पिण्याचा परवाना वाटप करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथम शिबीर आयोजित केले. याविषयी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीअर बारमध्ये जाऊन मद्य पिणाऱ्यांना बारचालक पाच रुपये शासनाचे शुल्क घेऊन दारू पिण्याचा एक दिवसाचा परवाना देतो. शिवाय दारू पिण्याचे लायसन्स असलेल्या व्यक्तीलाच वाईन शॉपचालकाने दारू विक्री करावी, असा नियम आहे. ज्या व्यक्तीकडे दारू पिण्याचा परवाना नाही. त्या व्यक्तीकडून पाच रुपये शुल्क घेऊन त्याला एक दिवसाचा परवाना द्यावा, असा नियम आहे. मात्र, बऱ्याचदा परवाना न घेताच दारू विक्री होते. ही बाब लक्षात आल्यानंतर अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवट, अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक के.पी. जाधव, मोहन मातकर, आशिष महेंद्रकर, सहायक दुय्यम निरीक्षक अनंत शेंदरकर, गणेश नागवे आणि कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी पुढकार घेतला.
परवाना कशासाठी?
विनापरवाना दारू जवळ बाळगणे अथवा वाहतूक करणे कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. अशा व्यक्तीला पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अटक करू शकतात. परवानाधारक व्यक्ती शासनमान्य दुकानातून देशी, विदेशी मद्याच्या १० बाटल्या खरेदी करू शकतो आणि स्वत:च्या घरी ठेवू शकतो.