हेल्मेट नसल्यास लायसन्स होणार रद्द, नव्या वाहतूक नियमांमध्ये दंडाच्या कडक तरतुदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 04:36 PM2021-12-07T16:36:34+5:302021-12-07T16:36:58+5:30
वाहतूक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची तब्बल २६ महिन्यांनंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांना पाच हजारांचा दंड, तसेच हेल्मेट नसल्यास लायसन्स रद्द होणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे.
नंबर प्लेटवर दादा, मामा तर हजाराचा दंड
वाहनांवर विशिष्ट नंबरच्या माध्यमातून दादा, मामा अशी नावे लिहिली जातात. परंतु अशा प्रकारे दादा, मामा लिहिणेही आता चांगलेच महागात पडणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट बसविणाऱ्यांना यापूर्वी २०० रुपये दंड केला जात होता, तो आता एक हजार रुपये करण्यात आला आहे.
थकीत दंडही नव्या नियमानुसार आकारणार
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन पद्धतीने दंड लावण्यात येतो. परंतु अनेक वाहनचालक वेळीच दंड भरत नाहीत. आरटीओ कार्यालयाकडून सुधारित कायद्यानुसार दंड आकारणीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे यापूर्वी दंड थकलेला आहे, त्यांच्याकडून नव्या नियमानुसार दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
कारवाईचा बडगा
अनधिकृत वाहनचालक, विनालायसन्स, लायसन्स संपल्यानंतरही वाहन चालविणे आदींबाबत आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. आरटीओ कार्यालयाला यंदाच्या आर्थिक वर्षात २८९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. सुधारित कायद्यामुळे आता हे लक्ष्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुन्हा----जुना दंड- नवा दंड
- परवाना नसताना वाहन चालविणे-५००-५०००
- परवाना रद्द असताना वाहन चालविणे-५००-१०,०००
- लायसन्सची मुदत संपल्यानंतरही वाहन चालवणे- ५००- १०,०००
- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी, तीनचाकी)-१०००-१०००
- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (कार)-१०००-२०००
- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास(जड वाहने)१०००- १००० ते ४०००
- सीट बेल्ट नसणे-२००-१०००
- विनाकारण हॉर्न वाजवणे ५०० - १,००० ते ५,०००
- विनाविमा वाहन ३०० ते २,००० - २,००० ते ४,००