कळमनुरीत चाळीस हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2016 12:57 AM2016-05-03T00:57:54+5:302016-05-03T01:05:22+5:30
कळमनुरी: शहरातील विद्यानगर भागात घरमालकासह भाडेकरूंच्या घरावर डल्ला मारून चोरट्यांनी ४० हजार रूपयांचा माल लंपास केल्याची घटना १ मेच्या रात्री घडली.
कळमनुरी: शहरातील विद्यानगर भागात घरमालकासह भाडेकरूंच्या घरावर डल्ला मारून चोरट्यांनी ४० हजार रूपयांचा माल लंपास केल्याची घटना १ मेच्या रात्री घडली.
विद्यानगर भागातील शिक्षक सुरेश होडबे हे १ मे रोजी घराला कुलूप लावून आपल्या गावी गेले होते. याचा फायदा घेत चोरटयांनी कुलूप तोडून घरातील खोलीमध्ये प्रवेश केला. दरम्यान घरातील कपाट फोडून त्यातील १० ग्रॅम सोन्याची अंगठी, आठ हजार रूपयाचा मोबाईल व ५०० रूपये नगदी असा ऐवज लंपास केला.
त्यानंतर चोरटयांनी आपला मोर्चा त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर किरायाने राहणाऱ्या सतीश पवार यांच्याकडे वळविला. किरायदार सुद्धा बाहेरगावी गेले असल्यामुळे चोरटयांनी घरात प्रवेश करून चांदीचे जोडवे, तीन ते चार हजार रूपये किंमत असलेली चांदीची मूर्ती चोरली. त्यानंतर चोरटे दुसऱ्या खोली जात असताना त्याठिकाणी झोपलेल्या एका मुलाला आवाज आल्याने त्याने उठून चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला, पण हाताला झटका देवून चोरटा पळ काढण्यात यशस्वी झाला.
चोरी झाल्याचे शेजाऱ्यांना कळल्यानंतर फोनवरून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लगेच पोलिसांनी तेथे भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. तर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नसल्यामुळे शहरात चोरीचे प्रमाण वाढले असल्याने गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी या घटनेच्या पार्श्वभुमीवर नागरिकांतून केली जात आहे. (वार्ताहर)