९ आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:43 AM2017-08-05T00:43:08+5:302017-08-05T00:43:08+5:30
बीड तालुक्यातील नेकनूर येथील महावीर सुरवसे खून प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयाने १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. २३ वर्षे खटला चालल्यानंतर १४ पैकी ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड तालुक्यातील नेकनूर येथील महावीर सुरवसे खून प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयाने १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. २३ वर्षे खटला चालल्यानंतर १४ पैकी ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर तिघांचे सुनावणीदरम्यान निधन झाले.
नेकनूरपासून जवळच असलेल्या कुंभारी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत अविश्वास ठराव मांडण्याप्रकरणी गावातील १४ जणांनी महावीर सुरवसे, सुमंत भालेराव व वचिष्ठ वाघमारे या तिघांना बेदम मारहाण केली होती. त्यात महावीर सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला होता. नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने या १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात फिर्यादी सुमंत भालेराव व राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. पी.व्ही. नलावडे व न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठाने १४ पैकी ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये रावसाहेब सुरवसे, मनोहर सुरवसे, भास्कर ऊर्फ बंडू सुरवसे, बाबूराव सुरवसे, भाऊसाहेब सुरवसे, पंजाब सुरवसे, चंद्रसेन सुरवसे, शहाजी सुरवसे, शिवाजी सुरवसे यांचा समावेश आहे.
शासनातर्फे सहायक सरकारी वकील सचिन सलगारे, तर फिर्यादी सुमंत भालेराव यांच्या वतीने एम.जी. कोळसे यांनी बाजू मांडली.
अंतिम सुनावणीत खंडपीठाने दिगंबर सुरवसे व मोहन काळे यांची निर्दोष मुक्तता केली. सुनावणी प्रक्रियेदरम्यान आरोपी लिंबाजी सुरवसे, गोरख वाघ व उद्धव सुरवसे यांचे निधन झाले होते. सरपंच पद निवडीवेळी आरोपी उद्धव लिंबाजी सुरवसे विरुद्ध महावीर भीमराव सुरवसे यांनी अविश्वास ठराव दर्शविला होता. तसेच नवीन घरकुल योजनेच्या वाटपातही विरोध केला होता.