अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 08:39 PM2018-12-21T20:39:42+5:302018-12-21T20:40:25+5:30
१३ वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मिनार दिलीप त्रिभुवन याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : जिवे मारण्याच्या धमक्या देत १३ वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मिनार दिलीप त्रिभुवन याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी (दि. २१ डिसेंबर) ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पोक्सो) दुरुस्तीनंतर या कायद्यांतर्गत येथील सत्र न्यायालयाने पहिल्यांदाच जन्मठेप ठोठावली असल्याचे अभियोगपक्षातर्फे सांगण्यात आले. या संदर्भात पीडित मुलीने फिर्याद दिली होती. त्यानुसार तिचे आई-वडील वेगळे राहतात. सदर मुलगी आई व भावासोबत राहते. आरोपी मिनार दिलीप त्रिभुवन (२८, रा. म्हाडा कॉलनी, मूर्तीजापूर परिसर) याचे मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते.
२०१४ मध्ये मुलगी घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीसह आई व भावाला जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर सलग तीन वर्षे आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. कंटाळून या प्रकाराची माहिती मुलीने तिच्या आईला दिली. मुलीने ४ सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन भादंवि कलम ३७६ (२)(एफ)(एन) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ५ व ६ अन्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कोते यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादी, तिची आई व डॉक्टरांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावाही महत्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३७६ (२)(एफ)(एन) तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ५ व ६ अन्वये दोषी ठरविले, तर ‘पोक्सो’कायद्याच्या कलम ५ व ६ अन्वये आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला.