पत्नीचा जाळून खून करणाऱ्यास जन्मठेप व दंड
By Admin | Published: September 15, 2015 12:00 AM2015-09-15T00:00:32+5:302015-09-15T00:35:01+5:30
औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी
औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
सुरेश गिरी हा पत्नी बेबी, मुलगा रमेश आणि मुलगी माया यांच्यासह राजनगर, मुकुंदवाडी येथे राहत होता. १८ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान बेबीबाई स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिचा पती सुरेश दारू पिऊन आला. आपली मुलगी माया हिची सोयरीक बेबीने तिच्या माहेरच्या नात्यात गावाकडे का जमविली. मला मुलगी तेथे द्यायची नाही, असे म्हणून सुरेश पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्यावर बेबीबाई म्हणाली की, मुलगा चांगला आहे. मला मुलगी तेथेच द्यायची आहे. यावरून दोघांत वाद झाला. सुरेशने बेबीला मारहाण करून ‘तुला मारूनच टाकतो, जाळून टाकतो’ असे म्हणून स्टोव्हमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. बेबीने आरडाओरड केल्यानंतर सुरेश पळून गेला, तर आईचा आवाज ऐकून छतावर झोपलेला मुलगा आणि मुलगी खाली आले. मुलगा रमेश (२०) याने आईच्या अंगावर रग टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. रमेशने सर्व नातेवाईकांना फोन करून घटनेविषयी माहिती दिली.
बेबीबाई ६० टक्के भाजली होती. तिचा मुलगा, मुलगी आणि शेजारी गोरखनाथ जाधव यांनी बेबीबाईला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे पोलीस जमादार ए.आर. बिघोत यांनी तिचा जबाब नोंदविला असता तिने वरीलप्रमाणे हकिकत सांगितली. यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमित घुले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्टोव्ह, रॉकेलची कॅन आणि कपड्याचे तुकडे जप्त केले. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायदंडाधिकारी स.मु. गोखले यांनी पुन्हा बेबीबाईचा जबाब नोंदविला. त्यावेळीही तिने वरीलप्रमाणेच हकिकत सांगितली. १९ सप्टेंबर २०१२ रोजी बेबी मरण पावली. त्यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता राजेंद्र पी. मुगदिया यांनी एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी आरोपीचा मुलगा, मुलगी व इतर दोन, असे एकूण चार साक्षीदार फितूर झाले. बिघोत, गोखले आणि जाधव यांचे जबाब महत्त्वाचे ठरले.