पत्नीचा खून करणाऱ्या पतीसह सासूला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 07:04 PM2019-01-16T19:04:50+5:302019-01-16T19:07:49+5:30
सुभाष दारू व लॉटरीच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते.
औरंगाबाद : दारू व लॉटरीच्या आहारी गेल्याने झालेले कर्ज फेडण्यासाठी पत्नी संगीताने माहेरहून १० लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिचा जाळून खून करणारा पती सुभाष उत्तमराव पाटेकर (३३) आणि त्याला मदत करणारी त्याची आई यमुनाबाई उत्तमराव पाटेकर (५५) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी मंगळवारी जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला.
संगीताचा विवाह २००५ साली सुभाष पाटेकर याच्याशी झाला होता. त्यांना मुलगा गौरव (६) व मुलगी प्रतीक्षा (८), अशी दोन अपत्ये आहेत. सुभाष दारू व लॉटरीच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी पत्नी संगीताकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी त्याने तगादा लावला होता. याच कारणावरून ११ सप्टेंबर २०१५ रोजी सुभाष व संगीतामध्ये भांडण झाले. सुभाषने पत्नीपुढे अशोभनीय प्रस्ताव ठेवला. तिने त्याला नकार देताच त्याने संगीताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत संगीताने घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता सासू यमुनाबाईने तिला घरात ढकलले. संगीता सासूला ढकलून मदतीसाठी घराबाहेर आली. हे बाहेर खेळणारी संगीताची मुलगी प्रतीक्षाने पाहिले. गल्लीतील लोकांनी आग विझवून संगीताला घाटी रुग्णालयात दाखल केले. यात संगीता ९५ टक्के भाजली होती. उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्याच दिवशी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. संगीताच्या जबाबावरून पती सुभाष आणि सासू यमुनाबाई आणि दीर बाळू व नीलेश यांच्याविरुद्ध भादंवि. कलम ३०२ व ४९८ (अ) नुसार जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात मयत संगूताचा मृत्यूपूर्व जबाब, मुलगी प्रतीक्षा व संगीताचा जबाब लिहून घेणारे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पांचाळ यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी सुभाष व त्याची आई यमुनाबाई पाटेकर या दोघांना भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला, तर बाळू व नीलेश यांची निर्दोष मुक्तता केली.