विवाहितेचा खून करून जाळणाऱ्या प्रियकराला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:28+5:302021-09-03T04:04:28+5:30
औरंगाबाद : लग्न करण्यासाठी तगादा लावणाऱ्या विवाहितेचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून प्रेत जाळणारा प्रियकर ...
औरंगाबाद : लग्न करण्यासाठी तगादा लावणाऱ्या विवाहितेचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून प्रेत जाळणारा प्रियकर शैलेश उर्फ सनी अजय बेंजामिन (२५, रा. एन-६, सिडको) याला सत्र न्यायाधीश ए.आर. कुरेशी यांनी जन्मठेप आणि विविध कलमांखाली २५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच मयताच्या मुलीचा मोबदला निश्चिती करण्यासाठी प्रकरण जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे वर्ग केले.
याबाबत मयत चंद्रकला उर्फ चंदा उर्फ ज्योत्सना अनिल अंभोरे हिचा भाऊ तात्या आंबु शिवरकर (रा. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंद्रकलाचे १० वर्षांपूर्वी अनिल अंभोरेशी (रा. हिंगण घाट, वर्धा) लग्न झाले होते. त्यांना मुलगी झाल्याने अडीच वर्षांनी पतीने तिला सोडले. तेंव्हापासून ती भावासोबत राहत होती. शैलेश वाहनचालक असून तो जालन्यात नेहमी येत-जात असल्याने त्यांची ओळख झाली. दोन वर्षांपूर्वी आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून चंद्रकलाला मुलीसह औरंगाबादेत आणून हनुमाननगरात भाड्याने खोली घेतली.
खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
१५ जून २०१६ रोजी चंद्रकलाने शैलेशला लग्नासाठी तगादा लावला. लग्न न केल्यास तुझ्या बहिणीच्या साखरपुड्यात गोंधळ घालीन, अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपीने तिच्या तोंडात ओढणी कोंबून गळा दाबून खून केला. मध्यरात्री चिकलठाणा आठवडी बाजारालगत चंद्रकलाचे प्रेत पेट्रोल टाकून जाळले. गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आली. तपासादरम्यान, मयताची ओळख पटल्यानंतर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्षीदारांचे जबाब व शिक्षा
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी १७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे होते. आरोपीच्या मोबाइल सीडीआरवरून आरोपी व मयताचे संबंध होते व ते एकत्र राहत होते, हे निदर्शनास आणून दिले. आरोपीचे घटनेपूर्वी व घटनेनंतरच्या मोबाइल लोकेशनवरून त्यानेच खून केल्याचे सिद्ध झाले.
---------------------------------------------------