सुनेला जाळल्याप्रकरणी सासूला जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Published: July 29, 2015 12:16 AM2015-07-29T00:16:31+5:302015-07-29T00:50:12+5:30
अंबाजोगाई : क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू विजयाबाई देशमुख हिला
अंबाजोगाई : क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू विजयाबाई देशमुख हिला अंबाजोगाई येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शहरातील खडकपुरा परिसरातील राजेश संभाजी देशमुख याचा विवाह सारिका हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सारिका हिला कुटुंबात शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. ६ एप्रिल २०१० रोजी सायंकाळी ८ वाजता सारिका घरात जेवण करतांना तिची सासू विजयाबाई देशमुख हिने, तू सकाळी चांदीचा करंडा का घेतला होतास? या कारणावरून भांडण करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकून मेणबत्तीने पेटवून दिले. यात सारिका गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना सारिका हिचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला होता. त्या जबाबानुसार पती राजेश देशमुख, सासू विजयाबाई देशमुख, सासरा संभाजी देशमुख यांच्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. उपचार सुरू असताना १० एप्रिल रोजी सारिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालिन उपअधीक्षक स्वाती भोर, फौजदार डी. बी. चिखलीकर यांनी केला व आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरील प्रकरण सुनावणीसाठी येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयासमोर आले. सरकारी वकील डी. व्ही. चौधरी यांनी याप्रकरणी आठ साक्षीदार तपासले. मृत्यूपूर्व जबाब व आरोपीविरुद्धचे ठोस पुरावे ग्राह्य धरून हांडे यांनी सासू विजयाबाई संभाजी देशमुख हिला दोषी ठरवून कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने चौधरी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. आर. एस. सापते, अॅड. विकास काकडे, अॅड. सचिन चौधरी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)