कपाशीच्या चिमट्याने खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:04 AM2021-01-23T04:04:56+5:302021-01-23T04:04:56+5:30
वैजापूर : शेतातील बांध फोडल्याची बदनामी करतो म्हणून डोक्यात कपाशी काढण्याचा चिमटा मारून भाऊबंदाचा खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा ...
वैजापूर : शेतातील बांध फोडल्याची बदनामी करतो म्हणून डोक्यात कपाशी काढण्याचा चिमटा मारून भाऊबंदाचा खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शिवाजी गंगाधर बोऱ्हाडे (३३, रा. रामपुरी वडगाव, ता. गंगापूर) यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच या खटल्यातील अन्य चार संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१५ मध्ये झालेल्या या घटनेत किशोर परसराम बोऱ्हाडे यांचा मृत्यू झाला होता.
रामपुरी वडगाव येथील रहिवासी किशोर बोऱ्हाडे यांना २ मे २०१५ घरी असताना त्यांचे भाऊबंद शिवाजी बोऱ्हाडे, कडू बोऱ्हाडे, पुंजाराम बोऱ्हाडे व शिवाजीची पत्नी उज्ज्वला यांनी बांध फोडण्यावरून आमची बदनामी करतो म्हणून मारहाण केली. यातून वाचण्यासाठी किशोर हे घरात पळाले असताना शिवाजी बोऱ्हाडे याने घरात घुसून कपाशी उपटण्याच्या चिमट्याने किशोर यांच्या डोक्यात वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या किशोर यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पाेउनि. आर. एम. जोंधळे यांनी तपास करून वैजापूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सुनावणीच्या वेळी एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी, मयताची पत्नी, डॉक्टर व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वापूर्ण ठरली. यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी शिवाजी बोऱ्हाडे यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. तसेच कलम ४५२ खाली आरोपीस न्यायालयाने ३ वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. या दोन्ही सजा एकत्र भोगावयाच्या आहेत. याप्रकरणात आरोपी गंगाधर बोऱ्हाडे, पुंजाराम बोऱ्हाडे, उज्ज्वला बोऱ्हाडे व कडू बोऱ्हाडे यांच्याविरुद्ध अपराध सिद्ध झाला नाही. त्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी काम पाहिले.