'फेमीकेशन' प्रक्रियेनंतर अजिंठा लेणीतील चित्रांचे आयुष्य वाढले, धोकादायक जीवजंतूंचा खातमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:15 PM2023-01-25T13:15:10+5:302023-01-25T13:16:39+5:30
अजिंठा लेणीतील चित्रांचे आयुष्य वाढविण्यासाठी केली रासायनिक प्रक्रिया, तीन दिवस दोन लेण्या ठेवण्यात आल्या होत्या बंद
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : अजिंठा लेणीतील शिल्पकलेच्या जतन व संवर्धनासाठी पुरातत्त्व रसायन विभागाने लेणी क्रमांक १६ व १७ मध्ये २२ ते २४ जानेवारीदरम्यान केलेल्या रासायनिक फेमीकेशन प्रक्रियेमुळे शेकडो धोकादायक किडे, जीवजंतूंचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यासाठी तब्बल ८ ते १० लाखांचा खर्च झाला असल्याचे समजते. याबाबत पुरातत्त्व विभागाने कमालीची गुप्तता बाळगली आहे. मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व रसायन विभागाचे उपअधीक्षक डॉ. विनोद कुमार यांनी दिली.
अजिंठा लेणीतील १६ व १७ क्रमांकाच्या गुंफेत ही प्रक्रिया करण्यात आली. यासाठी केमिकल विभागाचे जवळपास ३० कर्मचारी व दिल्ली येथील खास पथक बोलावण्यात आले होते. लेणीतील चित्रकृतींसाठी घातक असलेल्या किड्यांना मारण्यासाठी घातक १४ (गॅस सिलिंडर) वायू लेणीतील या खोल्यांमध्ये सोडण्यात आले होते. त्याचा दुष्परिणाम पर्यटकांवर होऊ नये, यासाठी पर्यटकांना तिकडे जाण्यास २२ ते २४ जानेवारी असे तीन दिवस बंदी होती. सोमवारी रात्री बंद खोल्या उघडून घातक गॅस (वायू) बाहेर काढण्यात आला. त्यानंतर खात्री करून बुधवारी सकाळी पर्यटकांसाठी लेणी खुली करण्यात येणार आहे. रासायनिक प्रक्रियेत किती किडे, जीवजंतू मारले गेले, याची गोपनीयता पुरातत्त्व केमिकल विभागाने पाळली आहे. शेकडो घातक जीवजंतू लेणीच्या पेंटिंगला पोखरत होते. ते सर्व जीवजंतू यात मारले गेले. ही प्रक्रिया यशस्वी झाली. अनेक घातक जीवजंतू मारले गेले, याचा दुजोरा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.
अजिंठा पर्वतरांगेतील बेसॉल्ट खडकात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोरली गेली आहे. वेळोवेळी होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे लेणीतील बेसॉल्ट खडकाची झीज होते. त्यामुळे पर्वत माथ्यावरील खडकांच्या मूळ स्तराला सूक्ष्म छेद पडून पावसाचे पाणी खडकांत मुरते आणि खडक ठिसूळ होतो. खडकांत पाणी मुरल्यामुळे अशा ठिकाणी अति सूक्ष्म जीवजंतू व बुरशीजन्य वनस्पतीची वाढ होते. ही सर्व प्रक्रिया नैसर्गिक असली तरी या बदलाचा परिणाम अजिंठा लेणीतील पुरातन ठेव्यावर होऊन येथील चित्रशैली व शिल्पकलेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा संभाव्य धोका टाळून अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रसायन शाखेकडून अजिंठा लेणीत वेळोवेळी रासायनिक प्रक्रिया केली जाते.
प्रक्रियेचा ८ ते १० वर्षे परिणाम
एकदा प्रक्रिया केली तर किमान ८ ते १० वर्षे त्याचा परिणाम राहतो. त्यानंतर त्याचा परिणाम कमी होतो. मागील वर्षी लेणीतील गुंफा क्रमांक १ व २ मध्ये ही प्रक्रिया करण्यात आली होती. त्यातही शेकडो जीवजंतू मारले गेले होते. लेणीला प्लायवूड, स्पंच व पीओपीच्या साह्याने सीलबंद करण्याचे काम रसायन शाखेचे पुरातत्त्व रसायन तज्ज्ञ विभागाचे उपअधीक्षक डॉ. विनोद कुमार झा, अखिलेश भदोरिया, विमल जैस्वाल, नीलेश महाजन, समीर तडवी यांनी परिश्रम घेतले.