संवादातून उलगडली नाटककाराची जीवनसंहिता
By Admin | Published: September 15, 2014 12:47 AM2014-09-15T00:47:01+5:302014-09-15T00:57:47+5:30
औरंगाबाद : शाळेत असताना पानशेतच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या नाट्यमहोत्सवात सांभाळलेला कपडेपट ते ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ सारख्या आशयघन नाटकांचे लेखन- दिग्दर्शन...
औरंगाबाद : शाळेत असताना पानशेतच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या नाट्यमहोत्सवात सांभाळलेला कपडेपट ते ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ सारख्या आशयघन नाटकांचे लेखन- दिग्दर्शन.... महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकताना जिंकलेला पुरुषोत्तम करंडक ते ’पद्मश्री’ चा बहुमान.... तारुण्यसुलभ कुतूहलातून रंगमंचावर ठेवलेले पाऊल ते आजघडीला नाट्य वर्तुळात कोरलेली स्वतंत्र ओळख.... ख्यातकीर्त नाटककार डॉ. सतीश आळेकर यांनी स्वत:सह मराठी नाटकाचाही प्रवास चित्रमय शैलीत उलगडला.
साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात डॉ. आळेकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.
यावेळी साहित्य अकादमीचे कृष्णा किंबहुने, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह कुंडलिक अतकरे उपस्थित होते.
डॉ. आळेकर म्हणाले, घरात सतत नाटकाच्या चर्चा सुरू असायच्या. आई-वडील रंगायन, पृथ्वी थिएटरची नाटके पाहायचे. साधनेच्या कलापथकातील कलाकारांचाही घरात वावर असायचा. शालेय काळात नाटकांमध्ये काम केले नाही. मात्र, महाविद्यालयात असताना अपघातानेच एका नाटकात बदली भूमिका केली. पुढे एम. एस्सी. ला असताना लिहिलेली ‘झुलता पूल’ ही एकांकिका स्पर्धेत कमालीची गाजली. या काळातच डॉ. जब्बार पटेल यांच्याशी स्नेह जुळला. अनेक समविचारी सहकारी मिळाले. त्यातून लेखनासह जीवनविषयक भूमिकाही पक्क्या होत गेल्या. लेखक व व्यक्ती म्हणूनही माझा कल कायम डावाच राहिलेला आहे.