पाण्यासाठी जीवघेणी कसरत
By Admin | Published: June 26, 2014 11:45 PM2014-06-26T23:45:13+5:302014-06-27T00:15:56+5:30
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
डोंगराळ भाग असलेल्या लक्ष्मण नाईक तांडा परिसरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते; परंतु गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई जाणवली नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाण्याबाबत ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
लक्ष्मण नाईक तांडा या गावासाठी १५ वर्षापासून पाणीटंचाई निवारणार्थ शासनाकडून ३ योजना राबविल्या गेल्या. यामध्ये जलस्वराज्य प्रकल्प, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आमदार फंडातून या योजनेवर जवळपास ५० लाख रूपये खर्च झाले असून सुद्धा लक्ष्मण नाईक तांडा येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे.
जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे; परंतु या योजनेत पाईपलाईनचे काम बरोबर झाले नसल्यामुळे गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली आहे.
या गावातील सार्वजनिक विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणी भरावे लागते. गेल्या आठवड्यात पाणी काढत असताना एका तरुणाचा तोल गेल्याने याच विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एवढी मोठी घटना घडून सुद्धा प्रशासनाने पाणी प्रश्न सोडविलेला नाही, हे विशेष. (वार्ताहर)