लाईफलाईन हॉस्पिटल, बालाजी गृहउद्योगाला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:02 AM2021-03-10T04:02:57+5:302021-03-10T04:02:57+5:30
सिडको एन ३ येथील डॉ. ए. के. सिद्दिकी यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे मोंढा येथील संतोष ...
सिडको एन ३ येथील डॉ. ए. के. सिद्दिकी यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे मोंढा येथील संतोष कासारे यांच्याकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्यामुळे पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या सत्तर व्यक्तींवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर थुंकणाऱ्या ४६ नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे ४६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात विविध प्रकारच्या कारवायांच्या माध्यमातून ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
इकरा स्कूलचे नळ कनेक्शन तोडले
औरंगाबाद : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकल्यामुळे महापालिकेच्या पथकाने कटकट गेट परिसरातील एस. टी. कॉलनी येथील इकरा स्कूलचे नळ कनेक्शन खंडित केले. इकरा शाळेच्या व्यवस्थापनाकडे मालमत्ता करापोटी ६ लाख ५६ हजार ८७ रुपये; तर पाणीपट्टीपोटी ४४ हजार रुपये थकले आहेत. कर न भरल्यामुळे अखेर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. दिवसभरात विविध मालमत्ताधारकांकडून ५ लाख १३ हजार २७२ रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
लॉकडाऊनमध्ये शहर बससेवा बंद
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ११ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात दर शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व व्यवहार बंद असणार आहेत. प्रत्येक शनिवारी, रविवारी शहर बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला असल्याची माहिती सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी दिली.
स्टेशन, विमानतळावर १३६ प्रवाशांची तपासणी
औरंगाबाद : महापालिकेतर्फे रेल्वे स्टेशन, विमानतळावर मंगळवारी १३६ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. सोमवारी (दि. ८) करण्यात आलेल्या चाचणीत दोन प्रवासी पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी रेल्वे स्थानकावर ९८, तर विमानतळावर ३८ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारच्या चाचणीत जे दोन प्रवासी पॉझिटिव्ह आढळले, ते रेल्वे स्थानकावरील होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.