लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:01 PM2024-09-19T13:01:01+5:302024-09-19T13:03:03+5:30

नीरज पांडे यांच्या वेब सिरीजचे चित्रीकरण थेट छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर 

Light, camera, action and Chhatrapati Sambhajinagar airport became Kolkata's 'Netaji Subhashchandra Bose International Airport' | लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’

लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बुधवारी अचानक ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे करण्यात आले. आश्चर्यचकित होऊ नका. विमानतळाचे नाव खरेखुरे बदललेली नाही. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक नीरज पांडे यांच्या आगामी बंगाली भाषेतील वेब सिरीजचे चित्रीकरण विमानतळावर झाले आणि या चित्रीकरणात छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ हे कोलकाता येथील विमानतळ म्हणून दाखविण्यात आले. त्यासाठी विमानतळाचे नाव बदललेले पहायला मिळाले.

चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, जाहिरात आदींच्या चित्रीकरणात अनेकदा विमानतळावरील दृश्य महत्त्वाचे ठरते. आजघडीला मुंबईसह अनेक विमानतळांवर चित्रीकरणासाठी गर्दीसह अनेक अडचणी येतात. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून चित्रपट निर्माते पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरातील विमानतळाकडे वळत आहे.

चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी सकाळी विमानतळावर येणाऱ्या प्रवासी विमानतळाचे नाव वाचून काहीसे चकीत झाले. पण लगेच शूटिंग सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळपर्यंत बंगाली भाषेतील वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू होते.

‘खाकी : द बंगाल चॅप्टर’
वेब सिरीजचे नाव आणि चित्रीकरणातील दृश्य गुपित ठेवण्यात आले. परंतु नीरज पांडे यांच्या ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’ या वेब सिरीजची घोषणा झाली. याच वेब सिरीजचे चित्रीकरण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी बंगाली अभिनेते, कलावंत विमानतळावर दाखल झाले होते. चित्रीकरणात कोलकाता विमानतळ म्हणून दाखविण्यात आले.

विमानतळावर चित्रीकरणासाठी कोण देते परवानगी?
विमानतळावर चित्रीकरण करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते.

विमानतळावर चित्रीकरणासाठी किती शुल्क ?
विमानतळावर चित्रीकरण करण्यासाठी तासानुसार ही रक्कम आकारली जाते. हे शुल्क साधारणपणे तासाला ७० हजार ते ८० हजार रुपये इतके असतात.

विमानतळावर झालेले यापूर्वी चित्रीकरण
- २२ जानेवारी २०२३ रोजी अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री ज्योतिका आणि अलाया एफ यांची भूमिका असलेल्या ‘श्री’ या चित्रपटाची शूटिंग झाली आहे.
- २८ जुलै २०२१ राेजी चिकलठाणा विमानतळावर अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’ चित्रपटाचे चित्रीकरण विमानतळावर झाले होते.

चित्रीकरणासाठी परवानगी
डायरेक्टर नीरज पांडे यांच्या वेब सिरीजचे चित्रीकरण विमानतळावर करण्यात आले. चित्रीकरणासाठी ‘डीजीसीए’ आणि ‘बीसीएएस’ यांच्याकडून परवानगी दिली जाते. त्यानुसार चित्रीकरणासाठी दिवसभराची परवानगी होती.
- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

Web Title: Light, camera, action and Chhatrapati Sambhajinagar airport became Kolkata's 'Netaji Subhashchandra Bose International Airport'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.