जालना शहरात एलईडीचा प्रकाश पडेना
By Admin | Published: October 11, 2016 11:51 PM2016-10-11T23:51:22+5:302016-10-11T23:59:40+5:30
जालना : नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून शहरभर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठराविक भाग वगळता शहर अद्यापही अंधारातच चाचपडत आहे.
जालना : नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून शहरभर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठराविक भाग वगळता शहर अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. त्यामुळे या दिव्यांचा सर्वदूर प्रकाश पडणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील पथदिवे दोन ते तीन वर्षांपासून बंद होते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. अनेक संघटनांनीही याबाबत आंदोलन केले होते. पथदिव्यांचे दहा कोटी रूपयांची थकबाकी भरण्यासाठी नगर पालिकेकडे पैसे नसल्याने ते दिवे बंदच होते आताही बंदच आहेत. नगर पालिका व पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेऊन एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे १५ हजार दिवे बसविण्याच निर्णय घेण्यात आला. काही दिवसांतच संपूर्ण शहर एलईडीने उजळेल असा पालिकेच्या अधिकाऱ्यांचा होरा होता. मात्र तो फोल ठरला. गणपती विसर्जन मार्ग वगळता अन्य भागात एलईडी दिवे कधी लागणार याबाबत कोणीच काही सांगत नाही. पालिकेचे विद्युत अभियंता दिवे लवकरच लागतील असे साचेबद्ध उत्तर देतात.
नगर पालिकेडे पथदिव्यांच्या थकबाकी पोटी सुमारे दहा कोटी रूपये थकित आहेत. वीज बिलांत सवलत मिळावी म्हणून महावितण कंपनीने अनेकदा संधी दिली, मात्र पालिकेला अद्यापही शक्य झालेले नाही. एलईडी दिवे सुरू करण्यासाठी पालिकेने एक कोटी रूपये भरून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र मूळ रक्कम अद्यापही वाढत आहे.
शहरातील गांधीचमन ते मुक्तेश्वर वेस वगळता अन्यत्र नवीन एलईडी दिवे बसविल्याचे दिसून येत नाही. अग्रसेन चौक ते बसस्थानक दरम्यान एलईडी दिवे बसविण्यात असले तरी ते वर्षभरापूर्वी बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पंधरा हजार दिवे कोठे बसविणार अथवा बसले याबाबत काहीच ताळमेळ नाही. नगर पालिकेने प्रभाग निहाय तसेच मुख्य रस्त्यांवर एलईडी दिवे लावून दिवाळीपूर्वी शहर लखलखीत करण्याची मागणी होत आहे.