स्वबळाच्या गर्जना विरल्या हवेत !

By Admin | Published: November 13, 2016 12:39 AM2016-11-13T00:39:51+5:302016-11-13T00:38:30+5:30

उस्मानाबाद पालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मनसेसह एमआयएम, स्वाभिमानी, रासप, रिपाइं आदी छोट्या पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले होते.

Lightning roaring in the air! | स्वबळाच्या गर्जना विरल्या हवेत !

स्वबळाच्या गर्जना विरल्या हवेत !

googlenewsNext

विशाल सोनटक्के उस्मानाबाद
पालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मनसेसह एमआयएम, स्वाभिमानी, रासप, रिपाइं आदी छोट्या पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले होते. मात्र या पक्षांना एकाही पालिकेमध्ये संपूर्ण जागांवर उमेदवार देता आलेले नाही. नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार देतानाही कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून सांगणाऱ्यांनाही बहुतांश ठिकाणी हा एकमेव उमेदवारही मिळाला नसल्याचे चित्र आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप या चार प्रमुख पक्षांसह भारिप, बसपा, स्वाभिमानी, रासप, मनसे, रिपाइं, शेकाप, एमआयएम आदी डझनाहून अधिक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यरत असतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या नेत्यांच्या, तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या म्हणून ओळखल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्ष सक्रीय राहिले तरच त्यांचे बळ वाढते. मात्र कार्यकर्त्यांसाठी असलेल्या नेमक्या याच निवडणुका छोटे पक्ष गांभीर्याने घेत नसल्याने ना पक्ष वाढतो, ना कार्यकर्ते मोठे होतात असेच चित्र वर्षानुवर्षे असल्याचे दिसून येते. यंदाची पालिका निवडणूकही याला अपवाद नाही. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, खासदार ओवेसी यांचा एएमआयएम, मायावती यांचा बहुजन समाज पार्टी यासह शेकाप आणि इतर पक्ष यांचे अस्तित्व या निवडणुकीत अत्यंत अत्यल्प असल्याचे दिसून येते. नगरसेवक पदासाठीच्या जागा सोडाच, वरीलपैकी एकाही पक्षाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जिल्ह्यातील आठही पालिकांमध्ये उभा करता आलेला नाही.
उमरगा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत आहे. येथे भाजपकडून अंजली चव्हाण, काँग्रेसकडून प्रेमलता टोपगे, तर शिवसेनेकडून शहबाज अ. रज्जाक अत्तार रिंगणात आहेत. येथून रासपाने विजया सोनकाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र तो मागे घेण्यात आल्याने आता थेट तिरंगी लढत होत आहे. कळंब नगरपालिकेत चौरंगी सामना रंगणार आहे. येथे राष्ट्रवादीकडून सुवर्णा मुंडे, शिवसेनेकडून छाया कुंभार, काँग्रेसकडून मोहिनी हुलजुते, भाजपाकडून सरस्वती बोंदर रिंगणात आहेत. येथे रुपाली सोनवणे यांचा अपक्ष म्हणून एकमेव अर्ज आहे. इतर पक्षांनी मात्र सदस्य सोडा नगराध्यक्ष पदासाठीही उमेदवार दिलेला नाही. परंडा नगरपालिकेत प्रमुख चार पक्षांव्यतिरिक्त अवघे दोन उमेदवार रिंगणात आहेत. यात रासपकडून आकाश जेधे आणि भारिप बहुजन महासंघाकडून राजेंद्रकुमार निकाळजे यांचे अर्ज दाखल आहेत. येथेही प्रमुख चार पक्षातच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. नळदुर्ग पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. येथे शिवसेना-भाजपासह एमआयएमला संपूर्ण जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणीही प्रमुख पक्षातच लढत दिसत आहे. तुळजापूर पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून, येथे राष्ट्रवादी उमेदवाराला शेकाप आणि रिपाइंने पाठिंबा दिला आहे, तर शहर विकास आघाडीच्या अमिता साळुंके यांच्या पाठीशी काँग्रेस, भाजपासह स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी राहिली आहे. शिवसेनेतर्फे विजया शिंदे रिंगणात असून, यांच्या व्यतिरिक्त भाग्यश्री कदम, उमा माने आणि रंजना साळुंके या तिघी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. उस्मानाबाद पालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे प्रमुख चार उमेदवारांसह राष्ट्रवादीचे बंडखोर अमरसिंह देशमुख, शिवसेनेचे बंडखोर राजेंद्र घोडके यांचा अर्ज दाखल असून, येथे मात्र इतर पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवार मैदानात उतरविले आहेत. भारिप बहुजन महासंघाकडून विकास बनसोडे, एमआयएमकडून मोमीन जफरअली हैदरअली मर्चंट, रिपाइंकडून संजयकुमार आत्माराम यादव, बसपाकडून संजयकुमार भागवत वाघमारे यांच्यासह विजय अशोक बनसोडे, शेख युसूफ इसमोद्दीन, सत्तार अफसाना सत्तार अब्दुल आणि डॉ. रविनंद नामदेव होवाळ यांचा समावेश आहे. उस्मानाबाद पालिकेत इतर पक्षांनी किमान नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असली तरी येथेही या पक्षाचे नेतेच मैदानात उतरल्याचे चित्र असून, यातील एकाही पक्षाला नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सर्व जागांवर देता आलेले नाहीत.

Web Title: Lightning roaring in the air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.