डाॅक्टरांप्रमाणे परिचारिकाही रुग्णांसाठी ‘देवदूत’; ‘तिच्या’मुळे रुग्णांच्या आयुष्याची दाेरी बळकट
By संतोष हिरेमठ | Published: May 12, 2023 01:02 PM2023-05-12T13:02:14+5:302023-05-12T13:02:51+5:30
नवजात शिशूंपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची कुटुंबीयांप्रमाणे काळजी घेते ‘सिस्टर’
छत्रपती संभाजीनगर : एखाद्याला हॉस्पिटलला भरती करण्याची वेळ आलीच तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच दवाखान्यात काळजी घेणारी व्यक्ती कोणी असेल तर त्या असतात नर्स’. अगदी एक दिवसाच्या शिशूपासून तर वृद्धाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी परिचारिका रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळेच डाॅक्टरांप्रमाणे परिचारिकाही रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत.
दरवर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. नर्स, सिस्टर आणि परिचारिका म्हणून ‘तिची’ ओळख आहे. गेल्या काही वर्षांत नर्सिंगमध्ये पुरुषांची संख्याही वाढत आहे. शासकीय रुग्णालय असो की खाजगी, प्रत्येक रुग्णाच्या वेदनेवर परिचारिका मायेची फुंकर घालत आहेत.
‘गोल्डन अवर’मध्ये मदत
हार्ट अटॅकच्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार, आवश्यक मदत आणि धीर देण्याचा नेहमीच प्रयत्न करते. आमच्या कामातून सेवा आणि वेतन या दोन्ही गोष्टी साध्य होतात.
- अनुजा टेकाळे, परिचारिका
रुग्णाला सर्वप्रथम धीर
उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला सर्वात आधी धीर देणे महत्त्वाचे ठरते. ‘मला काय होईल’ याची चिंता रुग्णाला सतावत असते. ही चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
- सोनाली गायकवाड, परिचारिका
शिशू बरे होतात, हे समाधान देणारे
वजन कमी आणि गुंतागुंतीमुळे अनेक नवजात शिशू ‘एनआयसीयू’त दाखल होतात. त्यांची सतत काळजी घेत असतो. अतिशय कमी वजनाची शिशूही बरी होऊन जातात, याचे मोठे समाधान आहे.
- जिजिता पुष्करण, एनआयसीयू नर्स
...तेव्हा नातेवाईक आशीर्वाद देतात
नवजात शिशूंवर उपचार करताना सतत लक्ष ठेवावे लागते. कोणाला तरी आमच्या रुग्णसेवेमुळे मातृत्वाचा आनंद मिळतो, ही आनंददायी वाटते. शिशू बरा होऊ जातो, तेव्हा नातेवाईक आशीर्वाद देतात.
- शेख हमीदा, बालरुग्ण परिसेविका
४० टक्के पुरुष नर्स
रुग्णसेवा करताना ३० वर्षे झाली आहे. रुग्णसेवेत महिला, पुरुष असा भेदभाव केला जात नाही. परिचारिका आणि ब्रदर हे दोघेही रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटत असतात. गेल्या काही वर्षांत पुरुष नर्स म्हणजे ब्रदरची संख्या वाढली आहे. घाटीत जवळपास ४० टक्के पुरुष नर्स आहेत.
- नाथा चव्हाण, इन्चार्ज ब्रदर
परिचारिकांच्या अन्य महाविद्यालयांत बदल्या नको
घाटीत परिचारिकांच्या एका वार्डातून दुसऱ्या वार्डात बदल्या होत असतात. परंतु आता अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत बदल्या होत आहेत. अशा प्रकारे बदल्या होता कामा नये. परिचारिका अहोरात्र रुग्णसेवा देतात. रुग्णांच्या औषधोपचारासाठी आवश्यक साहित्य वेळच्या वेळी उपलब्ध करून दिले पाहिजे.
- इंदूमती थोरात, सचिव, गर्व्हमेंट नर्सेस फेडरेशन
परिचारिका प्रशासकीय पदावरही
अलीकडे परिचारिका या प्रशासकीय पदावरही काम करीत आहे. परिचारिका म्हणजे महिलांचेच क्षेत्र समजले जायचे, मात्र आता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुले या क्षेत्रामध्ये प्रवेश घेत आहेत. त्याचे कारण या क्षेत्रात जॉब सेक्युरिटी आहे आणि परदेशातसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
- अनुसया सावरगावे - भोसले, सदस्य, महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई (मराठवाडा विभाग)