हद्द झाली ! भूमाफियांनी अस्तित्वात नसलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे विकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 06:42 PM2021-03-26T18:42:05+5:302021-03-26T18:44:09+5:30
The land mafia sold the non-existent plot फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने आरोपींची भेट घेतली तेव्हा आरोपींनी दुसरा भूखंड देण्याची तयारी दर्शविली.
औरंगाबाद : अस्तित्वात नसलेल्या भूखंडाचे बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत खरेदीखत करून देत भूमाफियाच्या टोळीने एकाची आठ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखेने चौकशी करून गुरुवारी आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. नदीम हसन शेख (रा. जयसिंगपुरा), एजंट नदीम इब्राहिम शेख (रा. रोशन गेट) आणि बादशाह ऊर्फ अय्याज खान बाबूखान (रा. बायजीपुरा) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार दत्तात्रय सुधाकर गायके (रा. मारोतीनगर) यांना बायजीपुरा येथील घर विकायचे होते. घराच्या बदल्यात प्लॉट देण्याची तयारी आरोपींनी दर्शविली. आरोपींनी गायके यांना बाळापूर शिवारातील एक हजार ५०० चौ. फू. क्षेत्रफळाचा आठ लाख ४० हजार रुपये किमतीचा भूखंड दाखविला. तक्रारदार यांच्या घराची किमत नऊ लाख रुपये निश्चित केली. यानंतर आरोपींनी तक्रारदार यांना तो भूखंड नावे करून दिला आणि तक्रारदाराकडून त्यांचे घर सिरसाट नावाच्या व्यक्तीच्या नावे करून घेतले. सिरसाटने हे घर लगेच दुसऱ्या एका व्यक्तीला आणि त्यांनी तिसऱ्याला विक्री केले. यानंतर बाळापूर सज्जाचे तलाठी शेळके यांनी तक्रारदार यांच्या रजिस्ट्री पेपरच्या आधारे त्या भूखंडाची फेर नोंदवहीत नोंद केली. यानंतर त्यांना त्यांचा सातबारा देण्यात आला. दरम्यान, ते भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांच्या भूखंडावर दुसऱ्याच व्यक्तीने हक्क सांगितला. त्याच्याकडेही सातबारा असल्याचे दिसले.
दुसरा वादग्रस्त भूखंड देण्याची तयारी
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने आरोपींची भेट घेतली तेव्हा आरोपींनी दुसरा भूखंड देण्याची तयारी दर्शविली. आरोपींनी दाखवलेले भूखंड वादग्रस्त असल्याचे समजल्याने त्यांनी त्यांचे घर परत करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत ते घर तिसऱ्याच व्यक्तीने खरेदी केल्याचे त्यांना समजले. आरोपींनी पैसेही परत केले नाहीत. यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.