‘लाईन’ आली अन् गेलीही; महापारेषणचे सबस्टेशन सुरू, पण गुपचूप
By Admin | Published: January 2, 2015 12:42 AM2015-01-02T00:42:53+5:302015-01-02T00:52:11+5:30
विजय सरवदे, औरंगाबाद कसलाही गाजावाजा न करता बीड रोडलगत उभारण्यात आलेले थापटी तांडा सबस्टेशन गुपचूपपणे कार्यान्वित करण्यात आले.
विजय सरवदे, औरंगाबाद
कसलाही गाजावाजा न करता बीड रोडलगत उभारण्यात आलेले थापटी तांडा सबस्टेशन गुपचूपपणे कार्यान्वित करण्यात आले. ‘डीएमआयसी’ आणि औरंगाबाद परिसरातील नागरिक, शेतकरी आणि उद्योगांसाठी पर्वणी ठरलेल्या या ७५० के.व्ही.च्या सबस्टेशनमध्ये काल थेट मध्यप्रदेशमधून उच्चदाबाची लाईन आली. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने विविध चाचण्या यशस्वी केल्यानंतर ती लाईन पुढे बाभळेश्वरमार्गे थेट मुंबईला पोहोचती केली.
औरंगाबादपासून जवळ असलेल्या थापटी तांडा परिसरात तीन वर्षांपासून या उच्चदाब सबस्टेशनचे काम सुरू होते. या सबस्टेशनमध्ये उच्चदाबाच्या दोन वाहिन्या (लाईन) आहेत. ८० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सबस्टेशन उद्घाटनासाठी सहा महिन्यांपासून मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. मात्र, काल मुंबई येथून अचानक महापारेषणचे संचलन संचालक ओमप्रकाश एमपाल व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादेत दाखल झाला. त्यांनी येथील महापारेषणच्या क्षेत्रिय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व अन्य अभियंत्यांना सोबत घेऊन सबस्टेशन गाठले.