क्रांतिसूर्यासमोर नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच भडकल गेटवर रांगा
By स. सो. खंडाळकर | Published: December 6, 2023 08:19 PM2023-12-06T20:19:44+5:302023-12-06T20:22:38+5:30
दिवसभर भीम अनुयायांनी येत व डॉ. बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली
छत्रपती संभाजीनगर : क्रांतिसूर्य, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच भडकल गेटवर शहरवासीयांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर भीम अनुयायांनी येत व डॉ. बाबासाहेबांना पुष्पांजली वाहून जात होते.
भारतीय बौद्ध महासभा, जयभीम मित्रमंडळ व रिपब्लिकन सेनेने भडकलगेटवर रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. तीनही ठिकाणी रक्तदानासाठी नागरिक सरसावले होते. दुपारपर्यंत तेथे मोठ्या संख्येने रक्तदान झाले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या शिबिराचे उद्घाटन भन्ते नागसेन यांच्या हस्ते करण्यात आले. रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित शिबिरात स्वत: सचिन निकम व टीम कार्यरत होती. जयभीम मित्रमंडळाच्या शिबिरात शाहरूख खान, स्वप्नील पाईकडे, सोमू भटकल आदी झटत होते.
‘एक वही, एक पेन’ या उपक्रमाला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत होता. संध्याकाळपर्यंत तो खूपच वाढला होता. दुपारपर्यंत साडेबारा हजार वह्या व साडेतीन हजार पेन जमा झाले होते. शेखर निकम, विश्वदीप करंजीकर, डॉ महेश बनसोडे, शांतिदुत मकसरे, पंकज सुकाळे, गौतम बावसकर, अभिजीत होनवाडजकर, विशाल आढ़ाव, मनीष नरवडे, सुकेशिनी मकसरे, वल्लरी खोबरागड़े, आशिष पाटील, भारत गायकवाड, विलास गिऱ्हे, दौलत शिरसवाल, डॉ विनीत कोकाटे, संदीप बोराडे, शैलेश चाबुकस्वार, कपिल बनकर, चेतन घुसळे हे यात परिश्रम घेत होते.
माता रमाई समाज सेवा कला संचाने बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भीमगीतांची बरसात केली. एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यात ज्येष्ठ गायिका व संचाच्या अध्यक्षा सखूबाई साळवे, कलाबाई हिवराळे, रेखा वाठोरे, गौतम आव्हाड, सिद्धार्थ कांबळे, नाना वाघ, वीर गुरुजी, राजेश तुपे, किरण आमराव, सुरेश सोनवणे, नामदेव वेलदोडे, सुभाष निर्फळ, हकिम शहा, जयेश निकाळजे व किरण जाधव या कलावंतांनी ही मैफल रंगवली.