लाइनमन म्हणाला, साहेब... तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:31 PM2022-06-18T19:31:51+5:302022-06-18T19:32:34+5:30
लाइनमनचे म्हणणे गांभीर्याने घ्या, विभागीय आयुक्तांनी सूचना केल्यानंतर यंत्रणेकडून आढावा
औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेला सुरळीत करण्यासाठी महसूलची यंत्रणा जुंपली असून, बारीक-बारीक मुद्द्यांवर प्रशासन लक्ष देत आहे. वितरण सुरळीत होण्यासाठी लाइनमनच्या बैठकीत एकाने तिसऱ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याचे सांगितले. त्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महसूल, एमजेपी व मनपाच्या यंत्रणेला त्याचे म्हणणे गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांच्या सूचनेनंतर त्या लाइनमनसोबत तिन्ही यंत्रणेतील प्रमुखांनी वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. त्या लाइनमनने दिलेल्या सुचनांनुसार, प्रशासन वितरणात किती सुधारणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.
३१ अधिकाऱ्यांनी शहरातील पूर्ण जलकुंभावरून होणाऱ्या जलवितरण व्यवस्थेचा आढावा घेत, त्यातील त्रुटी, गळती, चोऱ्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यानंतर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरूवारी लाइनमन्सची बैठक घेतली. फिडर लाइनवर असलेल्या नळजोडण्या ताबडतोब खंडित कराव्यात, याशिवाय शहरातील पाण्याच्या टाक्यांत पुरवठा करण्याकरिता पाणीसाठा होणार नाही, तसेच मेन लाइनवर असलेल्या नळ कनेक्शनला त्वरित मीटर बसविण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले. त्यानुसार, पथकांनी शुक्रवारी कार्यवाही सुरू केली. शहरात होणारा पाणीपुरवठा दोन किंवा तीन दिवसाआड कसा करता येईल, यासाठी लाइनमनच्या सूचना ऐकून घेत, उपाययोजना करण्यात येणार आहेत.
लाइनमनकडे उपाय, बाकीचे काय करत आहेत
लाइनमनकडे जर पाणीपुरवठ्यातील त्रुटी दुर करण्याचा उपाय असेल, तर मग बाकीचे अभियंते व इतर यंत्रणा काय करीत आहे, असा सवाल विभागीय आयुक्तांनी उपस्थित केला. अनेक ठिकाणी गळत्या आहेत. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन काढण्यात येणार आहेत. पुन्हा जर त्यावर कनेक्शन घेतले गेले, तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले. येत्या काही दिवसांनी मुख्यमंत्री पुन्हा योजनेच्या कामाचा आढावा घेणार आहेत.