लिंगायत बांधवांची एकतेची वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:58 PM2018-04-08T23:58:44+5:302018-04-08T23:59:41+5:30
‘एकच चर्चा, लिंगायत मोर्चा’, ‘एक ही नारा, लिंगायत धर्म हमारा’, ‘ लिंगायत एक्की भारताची शक्ती’ अशा गगनभेदी घोषणा देत रविवारी शहरातून लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात आला. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
औरंगाबाद : ‘एकच चर्चा, लिंगायत मोर्चा’, ‘एक ही नारा, लिंगायत धर्म हमारा’, ‘ लिंगायत एक्की भारताची शक्ती’ अशा गगनभेदी घोषणा देत रविवारी शहरातून लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात आला. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. भगवे फेटे बांधलेल्या व हातात फलक घेतलेल्या तरुणी व महिलाही तेवढ्याच ताकदीने घोेषणा देत होत्या. याद्वारे लिंगायत बांधवांनी ऐक्याची वज्रमूठ बांधली. त्यांचा संदेश देशभर पोहोचला, हेच या महामोर्चाचे फलित ठरले.
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीयस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी महामोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि डॉ. माते महादेवी यांनी केले. संतांच्या उपस्थितीने समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचा केंद्रबिंदू क्रांतीचौक होता. सकाळपासून समाजबांधव येथे एकत्र येत होते. मोर्चाची नियोजित वेळ सकाळी १० वाजेची होती, पण परजिल्ह्यांतून व काही परराज्यांतून निघालेल्या मोर्चेकऱ्यांना येण्यास वेळ लागत होता. यामुळे दुपारी १ वाजता महामोर्चा काढण्यात आला. प्रारंभी, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर क्रांतीचौकात राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आगमन होताच उपस्थित समाजबांधवांनी ‘लिंगायत धर्म की जय’ असा जयघोष करण्यास सुरुवात केली. यानंतर सजविलेल्या रथात महाराज विराजमान झाले. ‘लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन मोर्चा पुढे निघाला. पाठीमागील रथात डॉ. माते महादेवी (बंगळुरू) या विराजमान झाल्या होत्या. त्यामागील रथात चन्नबस्वानंद स्वामी व मृत्युंजय स्वामी विराजमान होऊन सर्वांना आशीर्वाद देत होते. मोर्चाच्या अग्रभागी भगवे फेटे बांधलेल्या व हातात विविध फलक घेतलेल्या तरुणी व महिला होत्या. महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. पुरुषांच्या बरोबरीने घोषणा देत महिला पुढे जात होत्या. त्यांच्या पाठीमागे भगव्या टोप्या घातलेले हजारोंच्या संख्येने समाजबांधव शिस्तीत चालत होते. प्रत्येक मोर्चेकºयांनी हातात भगवा ध्वज घेतला होता. बहुतांश जणांनी घोषणा लिहिलेले फलक हातात घेतले होते.
‘जागे व्हा केंद्र सरकार जागे व्हा ’, ‘ जागे व्हा जागे व्हा राज्य सरकार जागे व्हा’, अशा घोषणा देत मोर्चेकरी शासनाला इशारा देत होते. ‘भारत देशा जय बसवेशा’, ‘एक लिंगायत एक कोटी लिंगायत’ अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रांतीचौकातून निघालेला मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा, शहागंजमार्गे विभागीय आयुक्तालयासमोर पोहोचला. येथे मोर्चाचे रुपांतर धर्मसभेत झाले. मोर्चात लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर, जगन्नाथअप्पा वाडकर, जिल्हा समन्वयक प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगे, वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वर खर्डे अप्पा, दीपक उरगुंडे, डॉ. प्रदीप बैजरगे, गुरुपाद पडशेट्टी, सचिन संघशेट्टी, शिवा गुळवे, राजेश कोठाळे, गणेश वैैद्य, अभिजित घेवारे, भरत लकडे, गणेश कोठाळे, शिवा खांदकुळे, शिल्पाराणी वाडकर, चंपा झुंजारकर, जयश्री लुंगारे, सुंदर सुपारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१) लिंगायत धर्म महामोर्चाच्या निमित्ताने सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते.
२) क्रांतीचौकात व्यासपीठावर नेते लिंगायत धर्माची महती भाषणातून सांगत होते.
३) महिलांनी भगवे फेटे तर पुरुषांनी ‘मी लिंगायत’ असे वाक्य छापलेल्या टोप्या घातल्या होत्या.
४) परजिल्ह्यांतील समाजबांधवांना येण्यास उशीर लागत असल्याने तब्बल चार तास उशिरा मोर्चा काढण्यात आला.
५) दुपारी १ वाजता भर उन्हात मोर्चाला सुरुवात झाली.
६) राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या आगमनाने सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
७) मोर्चात महिला व तरुणींची संख्या वाखाणण्याजोगी होती.
८) मोर्चेकºयांसाठी जागोजागी पिण्याचे पाणी व शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
मोर्चेकºयांच्या उत्साहापुढे उन्हाचा तडाखाही फिका.
लिंगायत महामोर्चाची नियोजित वेळ सकाळी १० वाजता होती. मात्र, असंख्य समाजबांधव परजिल्ह्यांतून येत होते. महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक जाम असल्यामुळे त्यांना येण्यास उशीर होत होता. दुसरीकडे क्रांतीचौकात हजारो समाजबांधव सकाळी ९ वाजेपासून जमले होते. उन्हाचा पारा चढत होता. अखेर दुपारी १ वाजता महामोर्चाला सुरुवात झाली. तापत्या उन्हात किती मोर्चेकरी सहभागी होतील याविषयी शंका व्यक्त केल्या जात होती, पण मोर्चेकºयांच्या उत्साहापुढे उन्हाचा तडाखाही फिका पडला. जसजसा मोर्चा गुलमंडीपर्यंत येत होता तसतसे मोर्चेकºयांची संख्या वाढत होती.
लिंगायत समन्वय समितीचे नियोजन कौतुकास्पद
लिंगायत समन्वय समितीने महामोर्चाचे संपूर्ण नियोजन केले होते. मोर्चा यशस्वीतेसाठी मागील दोन ते तीन महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू होती. बैठकीवर बैठका सुरू होत्या. पदाधिकाºयांनी मोर्चाचे सूक्ष्म नियोजन केले होते. मोर्चेकºयांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात आली होती. तसेच मोर्चामुळे शहरवासीयांना त्रास होऊ नये, वाहतूक जाम होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत होती. मोर्चेकºयांसाठी क्रांतीचौकात पुरी-भाजीची व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चादरम्यान जागोजागी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. रविवारच्या मोर्चाच्या नियोजनासाठी शहरातील सर्व पदाधिकाºयांनी शनिवारची रात्र जागून काढली होती. मोर्चा यशस्वी पार पडल्याबद्दल सर्वांनी समितीच्या पदाधिकाºयांच्या कार्याचे कौतुक केले. हजारो मोर्चेकºयांनी शिस्तीचे पालन करून आदर्श घडविला.