राज्यात ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षणातच, केवळ ३ मार्गांचे अहवाल तयार करणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 07:13 PM2021-03-02T19:13:41+5:302021-03-02T19:16:35+5:30
या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण होणार कधी आणि प्रत्यक्ष त्यावरून रेल्वे धावणार कधी, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.
औरंगाबाद : राज्यात पाच, दहा नव्हे तर तब्बल ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षणातच अडकले आहेत. यातील केवळ ३ मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, त्यांचे अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. औरंगाबाद - नगर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेचे पथक सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले, यावेळी ही माहिती समोर आली.
मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. त्यात अनेक रेल्वे मार्गांचाही समावेश आहे. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात तब्बल ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण होणार कधी आणि प्रत्यक्ष त्यावरून रेल्वे धावणार कधी, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्व्हे) सुरेशचंद्र जैन आणि अन्य अधिकारी औरंगाबाद - नगर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी राज्यातील ४८ रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आपल्याकडे असल्याचे सांगितले. यात लातूर - कलबुर्गी, जालना - खामगाव आणि भुसावळ - पाचोरा - जामनेर - बोदवड या मार्गांचे अहवाल सध्या तयार केले जात असल्याचेही जैन यांनी सांगितले.
सर्वेक्षणाच्या जंजाळातच रेल्वे
रोटेगाव - कोपरगाव रेल्वेमार्ग, औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्ग, सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई व्हाया पैठण - औरंगाबाद - जळगावसह अन्य मार्ग वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून एकतर केराची टोपली दाखवली जाते अन्यथा तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. परिणामी, सर्वेक्षणाच्या जंजाळातच मराठवाड्याची रेल्वे अडकली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था वर्षांनुवर्षे ‘जैसे थे’च आहे.