लायन्स क्लबची शताब्दी वर्षपूर्ती : ‘लायन्स’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:59 AM2017-08-25T01:59:31+5:302017-08-25T01:59:54+5:30
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही.
औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही. असा भव्य नागरी सत्कार मी पहिल्यांदाच अनुभवत आहे,’ अशा शब्दांत अग्रवाल यांनी शहरवासीयांचे आभार मानले.
२१० देशांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सेवाकार्य सुरू आहे. लायन्सने शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून गुरुवारी शतकोत्तर पहिल्या वर्षात पाऊल टाकले. या ऐतिहासिकसमयी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याचा मान नरेश अग्रवाल या भारतीय उद्योजकांना मिळाला. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच अग्रवाल औरंगाबादेत आले होते. यानिमित्ताने लायन्स परिवार व औरंगाबादवासीयांतर्फे सकाळी तापडिया नाट्यमंदिरात त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
महापौर भगवान घडामोडे व ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी नरेश अग्रवाल यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, हा नरेश अग्रवाल यांचा सत्कार नव्हे, हा सन्मान भारतीय तिरंग्याचा आहे. मी ज्या देशांमध्ये लायन्सचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातो तेथे प्रथम आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, मी हिंदुस्थानी असल्याचा.
जगभरात सेवाकार्य करण्यासाठी लायन्सने आपली संख्या व ताकद वाढविली पाहिजे. सध्या देशात २ लाख ३५ हजार लायन्स आहेत.
येत्या काळात नवीन सदस्यांची संख्या ५ लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी सर्व लायन्स सदस्यांसमोर ठेवले. त्यास सर्वांनी हात उंच करून होकार दिला.
तत्पूर्वी अवघ्या ५१ दिवसांत नवीन २३ क्लब व ५५५ नवीन सदस्य केल्याबद्दल प्रांतपाल संदीप मालू यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली.
१०० किलोचा केक व धान्यतुला
शताब्दी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांची धान्यतुला करण्यात आली. हे धान्य इस्कॉनच्या अन्न अमृत योजनेत देण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १०० किलोचा केक कापण्यात आला. हा केक शहरातील अनाथालय, वृद्धाश्रम, दिव्यांगांच्या आश्रमांना वाटण्यात आला.