लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:42 AM2017-08-25T00:42:51+5:302017-08-25T00:42:51+5:30

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

Lions International President Naresh Agrawal felicitated | लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा सत्कार

लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा सत्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. सर्वांनी उभे राहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. औरंगाबादकरांच्या प्रेमामुळे सत्कारमूर्ती भारावून गेले. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही’, असा भव्य नागरी सत्कार मी पहिल्यांदाच अनुभवत आहे, अशा शब्दात अग्रवाल यांनी शहरवासीयांचे आभार मानले.
२१० देशांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सेवाकार्य सुरू आहे. लायन्सने शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून आज शतकोत्तर पहिल्या वर्षात पाऊल टाकले. या ऐतिहासिकसमयी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याचा मान नरेश अग्रवाल या भारतीय उद्योजकांना मिळाला. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेश अग्रवाल औरंगाबादेत आले होते. यानिमित्ताने लायन्स परिवार व औरंगाबादवासीयांतर्फे सकाळी तापडिया नाट्यमंदिरात त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. महापौर भगवान घडामोडे व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी नरेश अग्रवाल यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, आ. विक्रम काळे, माजी आ. एम. एम. शेख, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे यांची सोहळ्यास उपस्थिती होती. व्यासपीठावर माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, विविध समित्यांचे अध्यक्ष राजे मुधोजी भोसले, आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू, प्रांतपाल संदीप मालू, प्रांतपाल गिरीश मालपाणी, वासुदेव कलघटगी, सुनील व्होरा, डॉ. संजय व्होरा, नितीन बंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजेंद्र दर्डा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यानंतर नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, हा नरेश अग्रवाल यांचा सत्कार नव्हे, हा सन्मान भारतीय तिरंगा झेंड्याचा आहे. सव्वाकोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. मी ज्या देशांमध्ये लायन्सचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातो तेथे प्रथम आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, मी हिंदुस्थानी असल्याचा.
जगभरात सेवाकार्य करण्यासाठी लायन्सने आपली संख्या व ताकद वाढविली पाहिजे. सध्या देशात २ लाख ३५ हजार लायन्स आहेत. येत्या काळात नवीन सदस्यांची संख्या ५ लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी सर्व लायन्स सदस्यांसमोर ठेवले. त्यास सर्वांनी हात उंच करून होकार दिला. तत्पूर्वी अवघ्या ५१ दिवसांत नवीन २३ क्लब व ५५५ नवीन सदस्य केल्याबद्दल प्रांतपाल संदीप मालू यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. यावेळी ‘सेकंड सेंच्युरी अ‍ॅम्बॅसेडर’ झालेल्या लायन्स पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.नवल मालू व महावीर पाटणी यांनी करून दिला. प्रशांत वर्मा यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल गंभीर यांनी आभार मानले.

Web Title: Lions International President Naresh Agrawal felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.