घाटी रुग्णालयातील ‘लिक्विड आॅक्सिजन’ लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:51 PM2017-12-10T23:51:34+5:302017-12-10T23:51:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने ६ कोटींचा प्रस्ताव तयार केला; ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने ६ कोटींचा प्रस्ताव तयार केला; परंतु वैद्यकीय शिक्षण सचिवांनी नव्या प्रस्तावांऐवजी हातात असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने आगामी अनेक महिने सिलिंडर उचलून नेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संपल्यावर बदलण्याची कसरत कर्मचाºयांना करावीच लागणार
आहे.
घाटी रुग्णालयाच्या सर्जिकल इमारतीमध्ये शनिवारी आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला; परंतु आॅक्सिजन पुरवठ्यातील हा काही पहिलाच गोंधळ नाही.
यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. घाटीत अत्याधुनिक आॅक्सिजन यंत्रणा (सेंट्रल आॅक्सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. अनेक वॉर्डांत रुग्णास आॅक्सिजनची आवश्यकता भासल्यावर धावपळ करून आॅक्सिजन सिलिंडर लावला जातो. ‘घाटी रुग्णालय आॅक्सिजन सिलिंडरवर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून ही परिस्थिती समोर
आणली.
या वृत्ताची दखल घेत अखेर सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके लवकरच कायमस्वरूपी संपुष्टात येईल,अशी अपेक्षा व्यक्त झाली. रुग्णालयात दर महिन्याला आॅक्सिजनवर सुमारे ६ लाखांवर खर्च होतो. यामध्ये लहान मोठे सिलिंडर आणि लिक्विड आॅक्सिजनच्या माध्यमातून ३० वॉर्डांत आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. सिलिंडर उचलून नेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संपल्यावर बदलण्यासाठी मोठा ताण सहन करावा लागतो.
सिलिंडरचा वापर तिपटीने
दोन वर्षांपूर्वी सर्जिकल इमारतीमधील आॅक्सिजन रुममध्ये सिलिंडरला जोडण्यात येणारा पाईप फुटल्याने गोंधळ झाला होता. आॅक्टोबरमध्ये ट्रॉमा केअर वॉर्डच्या सेंट्रलाइज आॅक्सिजन सिस्टीममध्ये तब्बल आठ दिवस आॅक्सिजन गळती झाली. या कालावधीत आॅक्सिजन सिलिंडरचा वापर तिपटीने वाढला. तसेच जम्बो सिलिंडर एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी हलविताना सिलिंडर पायावर पडून कर्मचारी जखमी होण्याच्या घटनाही झाल्या आहेत.
प्रस्ताव २०१८ मध्येच लागणार मार्गी
घाटीत ७ डिसेंबर रोजी जवळपास १५ वर्षांनंतर वैद्यकीय शिक्षण सचिवांनी भेट दिली. या भेटीमुळे घाटीचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली; परंतु नवीन प्रकल्प हाती घेण्याऐवजी सध्या सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्जिकल इमारतीतील लिक्विड आॅक्सिजन सिस्टीमच्या प्रस्तावासह अनेक प्रस्ताव आता २०१८ मध्येच मार्गी लागणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आॅक्सिजन सिलिंडर हाताळणीतील प्रश्नांना घाटीला आणखी काही दिवस सामोरे जावे लागणार आहे.