दारू दुकानाविरुद्ध अंगावर ओतले रॉकेल
By Admin | Published: July 15, 2017 11:42 PM2017-07-15T23:42:46+5:302017-07-15T23:45:34+5:30
परभणी : शहरातील कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी सर्व पक्षीय नगरसेवकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी सर्व पक्षीय नगरसेवकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़
येथील कारेगाव रोड भागात जिल्हा उद्योग केंद्र, वन विभागाच्या कार्यालयासमोरच दारुचे दुकान थाटले आहे़ या परिसरात दुकानाच्या पाठीमागील बाजूस मुलींची शाळा, खाजगी शिकवण्या, शासकीय कार्यालये आणि नागरी वसाहत असल्याने दुकानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे़ तेव्हा येथील दुकान हटवावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दुकान सुरू करण्यास परवानगी दिली व हे दुकान सुरू झाले होते़ त्यामुळे दुकानाला विरोध दर्शविण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता़
या इशाऱ्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता़ सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास नगरसेवक आणि वसाहतींमधील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले़
कार्यालयात येत असतानाच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जिल्हा सरचिटणीस विशाल बुधवंत, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, प्रशास ठाकूर, विश्वजीत बुधवंत, रितेश जैन, अक्षय देशमुख, गणेश टाक आदींनी अंगावर रॉकेल ओतून प्रशासनाच्या विरूद्ध घोषणाबाजी केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत काडीपेटी व रॉकेलचा डबा आंदोलकांकडून ओढून घेतला. त्यानंतर आंदोलकांनी दारू बंदी झालीच पाहिजे, अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला़ नगरसेवक आणि नागरिकांचा विरोध झुगारून दारू दुकानाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ अर्धा तास घोषणाबाजी झाली़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले़
यावेळी प्रेरणाताई वरपूडकर, नगरसेविका माधुरी बुधवंत, वनमाला देशमुख, उषाताई झांबड यांच्यासह नगरसेवक प्रशास ठाकूर, चंद्रकांत शिंदे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, विशाल बुधवंत, विश्वजीत बुधवंत, सय्यद कादर, चेतन सरकटे, श्री सलगर, रवि राजपूत, मनोज कुलकर्णी आदींनी दारू दुकानाला विरोध केला़ हे दारुचे दुकान तात्काळ बंद करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली़ त्यावर जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांनी आजच तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले़ तसेच महानगरपालिकेचा दारु दुकानाविरूद्ध ठराव घ्यावा, असा सल्ला दिला़ त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून हे दुकान बंद करावे, त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज काय, असा सवाल बाळासाहेब देशमुख यांनी केला़ महापालिकेची पुढील सभा होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल़ त्यामुळे सध्या तरी दुकानाचा परवाना रद्द करावा, सर्वसाधारण सभेत आम्ही ठराव घेवू, असे सर्व नगरसेवकांसह विशाल बुधवंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले़