माझेच ऐकून घ्या, मी थेट दिल्लीतून आलोय; कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यातले प्रश्न टाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:21 PM2018-06-22T12:21:25+5:302018-06-22T12:38:11+5:30
दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले
औरंगाबाद : पीककर्जापायी शेतकरी मेटाकुलीला आला असून, सावकाराच्या दारात जाण्याची त्याच्यावर वेळ आली आहे. सध्या राज्यातील पीककर्जाची स्थिती काय आहे, या प्रश्नावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काहीही उत्तर दिले नाही. दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते. ‘मी काय म्हणतो, तेच ऐकून घ्या, असा सूर त्यांनी शेवटपर्यंत लावून धरला. शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या प्रश्नावर त्यांनी शेवटपर्यंत काहीही उत्तर दिले नाही. दिल्ली येथे शेतमालाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यासोबत पाशा पटेल यांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तासभर त्यांनी दिल्ली दरबाराचे गोडवे गायले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सचिव गटासमोर मत मांडण्याची संधी मिळाली, हे सांगताना त्यांना आपण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असल्याचाही विसर पडला होता.
मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय
राज्यातील पीककर्जाची स्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय. मला केवळ अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना ताळ्यावर आणल्याची माहिती आहे. कारण ते माझे मित्र आहेत. बाकीचे काहीही विचारू नका, असे सांगून त्यांनी हात झटकले. तुमचेच किती ऐकून घ्यायचे, आम्ही काही प्रश्न विचारायचेच नाही का? असे बोलून पत्रकारही संतापले. त्यावर पटेल म्हणाले, विचारा; परंतु त्यांनी शेवटपर्यंत ३५ ते ४० वर्षांपासून शेतकरी चळवळीत कसे काम केले, हे सांगण्यावरच भर दिला.