भर उन्हात निकाल ऐकण्यासाठी कान स्पिकरकडे
By Admin | Published: October 20, 2014 12:07 AM2014-10-20T00:07:52+5:302014-10-20T00:33:51+5:30
सोमनाथ खताळ ,बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हा निकाल जाहीर करण्यात आला.
सोमनाथ खताळ ,बीड
लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल ऐकण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. भर उन्हातही कार्यकर्त्यांचे कान स्पिकरकडे असल्याचे दिसून आले. एकूणच कार्यकर्त्यांच्या गर्दीने बाजार समितीचा परिसर फुलून गेला होता. निकालाची लागलेली उत्कंठता अखेर रविवारी पुर्ण झाली.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६ मतदारसंघातून निवडणूक घेण्यात आली. तसेच लोकसभेची पोटनिवडणूकही घेण्यात आली होती. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी या दोन्ही निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळेसची विधानसभेची निवडणूक एकतर्फी ठरली. सहा विधानसभा मतदारसंघातून ५ भाजपाचे उमेदवार तर बीड मधून जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजयी झाले. आपल्या मतदारसंघातील उमेदवार विजयी होणार का? हे पाहण्यासाठी ज्या-त्या मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते सकाळपासूनच बाजार समिती परिसरात येताना दिसून आले.
सकाळी ८ वा. मतमोजणीला सुरुवात झाली. सहा मतदारसंघातील वेगवेगळ्या फेऱ्यांनुसार मतमोजणी पार पडली. प्रत्येक फेरीमध्ये आपल्या लाडक्या उमेदवाराला किती मते मिळतात? हे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांचे कान स्पिकरकडे असल्याचे दिसून आले. बाजार समितीच्या मागच्या बाजुच्या प्रवेशद्वारातून निकाल जाहीर केला जात होता.
समोरच्या बाजुसही कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल होती. गेवराई, केज, माजलगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांचा मतांचा आघाडी, पिछाडीचा चाललेला खेळ कार्यकर्त्यांचे ठोके वाढवत होता. शेवटी कार्यकर्त्यांची ही उत्कंठता चारनंतर शांत झाली. सकाळी ८ वाजेपासूनच कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी उत्सुकता लागली होती. अनेकजण आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करुन निकालाची माहिती देताना दिसून आले.