गाव-तांड्यावरील साक्षरतेचे वर्ग झाले बंद !
By Admin | Published: June 28, 2014 11:43 PM2014-06-28T23:43:14+5:302014-06-29T00:37:15+5:30
लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़
लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे प्रेरक आर्थिक अडचणीत सापडले असून गावा- गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये रात्री भरणारे साक्षरतेचे केंद्र बंद झाले आहेत़
१५ ते ६५ या वयोगटातील अशिक्षित, नवसाक्षर यांना साक्षर बनवून देशात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २००९ पासून साक्षर भारत अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ यात मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली या सात जिल्ह्यांचा समावेश आहे़ प्रत्येक गावातील १० नवसाक्षरांसाठी एक स्वयंसेवक आणि सर्व नवसाक्षरांना शिक्षण देण्यासाठी एका प्रेरकाची निवड करण्यात आली होती़
जिल्ह्यातील ७८७ गावांमध्ये १५७२ प्रेरकांची निवड करण्यात येऊन त्यांना दर तीन महिन्यांच्या नियुक्त्या निरंतर शिक्षण विभाकडून देण्यात येत होत्या़ प्रेरकांना मासिक दोन हजार रुपये मानधन देण्यात येते़ दररोज सायंकाळी दोन तास हे शिक्षणाचे वर्ग प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत भरण्याच्या सूचना करण्यात आल्याने त्यानुसार वर्ग भरण्यात येऊ लागले़ तीन वर्षे हा उपक्रम राबवून त्याची पाहणी करण्यात आली असता शासनाच्या धोरणाप्रमाणे कारवाई झाली नसल्याने केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त करीत पुन्हा सन २०१७ पर्यंत या अभियानास गेल्या वर्षी मुदतवाढ दिली़
गेल्या वर्षी ही मुदत वाढ देण्यात आली असली तरी केंद्र शासनाकडून प्रेरक व इतर शैक्षणिक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे गेल्या १७ महिन्यांपासून मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून प्रेरकांकडून सतत मागणी केली जात आहे़ परंतु, अद्यापही शासनाकडून मानधन मिळाले नाही़ त्यामुळे दररोज रात्री गावांत भरणारे शिक्षण केंद्र बंद पडले आहेत़ (प्रतिनिधी)
सर्वे राहिला अर्धवट़़़
या प्रेरकांच्या मदतीने जिल्ह्यातील कुटुंबांची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सर्वे सुरु करण्यात आला होता़ मानधनच थकित राहिल्याने प्रेरकांनी हा सर्वे अर्धवट स्थितीत सोडून दिला आहे़ त्यामुळे शिक्षण केंद्र बंद पडण्याबरोबरच सर्व्हेही अपूर्ण राहिला आहे़ प्रेरकांचे मानधनासाठी हेलपाटे सुरु आहेत़
केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने प्रेरकांचे मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती निरंतर शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी एस़ एस़ येलूरकर यांनी सांगितले़