‘साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी नसावीत’; साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांचे विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 06:58 PM2017-12-05T18:58:52+5:302017-12-05T18:59:52+5:30

मराठी साहित्य संमेलनांविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, लेखक, प्रकाशक आणि सजग वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘लोकमत’तर्फे एक परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला.

Literature meet should not be like engagement; The views of dignitaries on the backdrop of the literature conference | ‘साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी नसावीत’; साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांचे विचार

‘साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी नसावीत’; साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांचे विचार

googlenewsNext

- मयूर देवकर

औरंगाबाद : जगण्याचे सगळे संदर्भ बदलले असताना मराठी साहित्य संमेलनांचे वर्षानुवर्षे ठरलेले स्वरूप आज उपयुक्त आहे का? साहित्यातील नवीन साहित्यिक, प्रवाह, माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, भाषेविषयी लोकांचे प्रेम वाढावे, भाषा अधिक समृद्ध व्हावी, यातून एक सजग वाचक निर्माण होऊन साहित्यिक चळवळ उभी राहावी या उद्देशाने सुरू झालेली संमेलने आजच्या परिक्षेपात किती गरजेची आहेत? नवलेखक व वाचकांना प्रेरित करण्यासाठी साहित्य संमेलनांच्या स्वरुपात काही बदल आवश्यक आहेत का? महादेव रानडे यांनी ज्या उद्देशाने १४० वर्षांपूर्वी या संमेलनाची सुरुवात केली तो उद्देश आज असफल होताना दिसतोय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, त्याविषयी लेखक, प्रकाशक आणि सजग वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘लोकमत’तर्फे एक परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला.

साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी करू नयेत
महामंडळांच्या धुरिणांनी साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी करू नयेत. केवळ तीन दिवसांचा सोहळा झाल्यानंतर त्यांना साहित्य विकासाचा विसर पडतो. परंतु वर्षभर त्यांचे काय कार्य चालते? अध्यक्षांनी केवळ भाषणे करीत राहायची का? त्यांनी नवलेखकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना तयार करायला हवे. त्यातूनच जीवनसापेक्ष, मानवी मूल्यांशी बांधिल असणाºया साहित्याची निर्मिती होईल. मराठी लेखक हा टुंड्रा प्रदेशातील खुरट्या झुडपांसारखा वाटतो. मराठीतील काही लेखकांचा अपवाद सोडला तर इतर सर्व अरबी समुद्रात बुडविण्यासारखेच आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नंदीबैल असू नये, असे माझे प्रांजळ मत आहे. त्याने कणखर अशी भूमिका घेऊन नवसाहित्याच्या निर्मितीसाठी झपाटून काम केले पाहिजे. तरच संमेलनांचा उद्देश सफल होईल.
- डॉ. ऋषिकेश कांबळे

महामंडळांच्या पदाधिका-यांना प्रकाशकांचे वावडे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजकांच्या लेखी प्रकाशकांची काहीच किंमत नाही. मुळात ते ग्रंथांना मानतच नाहीत. प्रकाशकांना तुच्छतेने वागणूक दिली जाते. प्रकाशक केवळ व्यवहारच करायला येतात असा त्यांचा समज झाला आहे. पूर्वी प्रकाशक संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं काढत असत, त्यांना पुढे आणत. आता मात्र तसा वाव राहिलेला नाही. प्रकाशक आले किंवा नाही आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशा वृत्तीचे लोक महामंडळामध्ये आलेले आहेत. त्यामुळे प्रकाशकही संमेलनांबाबत फारसे उत्साह किंवा स्वारस्य ठेवत नाहीत. विशेष म्हणजे नवीन लेखकांनाही संमेलनांविषयी काही वाटत नाही. संमेलनात केवळ टाळ्या मिळविणारे, वादग्रस्त विधान करणारे ‘परफॉर्मर’ वक्त्यांना बोलवले जाते. गंभीर साहित्याविषयी देणे-घेणेच नाही. 
- श्याम देशपांडे

स्वहितापेक्षा साहित्य हित महत्त्वाचे
म. फुलेंनी त्या काळी रानडेंना पत्र लिहून आयोजकांना विचारले होते की, आमच्या प्रश्नांवरती या संमेलनांमध्ये चर्चा होणार नसेल तर आम्ही तेथे येऊन काय कराचे? आज १४० वर्षांनंतरही ही स्थिती बदललेली नाही. साहित्य आणि भाषा विकासाऐवजी संमेलनांचा वापर केवळ स्वहित जपण्यासाठीच केला जातोय, असे दिसते. परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथदिंडी असे संमेलनाचे सगळे ठरलेले स्वरूप बदलण्याची अत्यावश्यकता आहे. विषयांमध्ये नावीन्यता नाही. जग किती झपाट्याने बदलत आहे, नवनवीन संदर्भ निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने चर्चा होण्याऐवजी कोणाला वक्ता म्हणून बोलवायचे यावरून विषय ठरतो. त्यामुळे नवीन लोकांना संधीच मिळत नाही. म्हणून एकदा सहभागी झाल्यानंतर किमान दोन वर्षे तरी त्यांना पुन्हा बोलवू नये. 
- डॉ. कैलास अंभुरे

आजचे संमेलन जीवनप्रवाहांशी विसंगत
आजच्ी संमेलने जीवनप्रवाहांशी सुसंवादी नाहीत. काही ठराविक लोकांच्या हातात ते गेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये समाजातील विविध घटकांना जे प्रतिनिधित्व मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळेच अस्मितादर्श, दलित संमेलन, लेखिका संमेलन, ग्रामीण संमेलन, अशी विविध छोटी-छोटी संमेलने होऊ लागली. साहित्याच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर त्यांना स्थान मिळत नसल्यामुळे ती महामंडळापासून दूर जात आहेत. म्हणून तर जातनिहाय, प्रदेशनिहाय संमेलने होत आहेत. यातून एक गोष्ट तर प्रतिबिंबित होते की, लोकांना संमेलने हवी आहेत. महामंडळाला आरसा दाखविण्याचे काम त्यांचे सदस्य करीत नाहीत. कारण ते लाभार्थी आहेत. म्हणून सर्वसमावेशकता येऊन संमेलनाच्या स्वरुपात परिवर्तन होणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रतिभा अहिरे

सर्वसमावेशक व्यासपीठ मिळत नाही
संमेलने जरूर व्हावीत; पण आजची तरुण पिढी संमेलनांना बांधील नाही. व्यक्त होण्यासाठी या संमेलनांशिवाय त्यांच्यासमोर तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ब्लॉग्स, सोशल मीडियावर लिखाण करणाºयांना किंवा नव्या धाटणीच्या लेखकांना अ. भा. मराठी साहित्य संमेलनात स्थान नाही. सर्वसमावेशक व्यासपीठ देण्यात ते कमी पडतात. केवळ आपल्या मर्जीतील किंवा ‘अभय’ असणाºयांनाच येथे संधी मिळते. काही तरी वेगळे करू पाहणाºयांना, त्यांच्या विचार व कार्यशैलीला विरोध करणाºया अनेक लेखक-कवींना जाणूनबुजून बाजूला केले जाते. शिवाय ज्यांचा साहित्याशी दूरदूरचा संबंध नाही ते लोक मतदार म्हणून संमेलनाचा अध्यक्ष ठरवितात. त्यामुळे  नवी पिढी संमेलनांशी जोडण्यासाठी व्यवस्थेत आमूलाग्र बदल गरजेचे आहेत.
- प्रिया धारूरकर

पदाधिकारी राजकीय कुरघोड्या करण्यात व्यग्र 
संमेलनांचे स्वरूप बदलावे, असे बंद खोलीत म्हणणारी मंडळी प्रस्थापिताना उघडपणे विरोध करताना दिसत नाही. महामंडळाच्या कार्यकारिणीत याविषयी प्रखर चर्चा का होत नाही? साहित्य संमेलन रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे, या नेमाड्यांच्या विधानावर महामंडळाने गप्प राहून त्यांच्या म्हणण्याला मूक संमती दिली असे मानावे लागेल. यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात संमेलनाकडे न फिरकणारे व महामंडळाचे लाभार्थी, असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. कोणीही भाषेचा प्रसार व्हावा, विकास व्हावा म्हणून प्रयत्न करीत नाही. संमेलनाला उत्सवी स्वरूप देऊन ती ‘इव्हेंट’ म्हणूनच गाजविली जातात. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणारे पदाधिकारी केवळ राजकीय कुरघोड्या करण्यात व्यग्र आहेत. काही ठोस उपाययोजना हाती घेण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही.
- सारंग टाकळकर

हे असावेत बदल
- घटक संस्थांच्या सर्व आजीवन सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा, मतदारांची संख्या वाढवावी.
- गट, वर्तुळ, धर्म, प्रदेश, विचारधारा, लिंग यापलीकडे जाऊन लेखकांना सामावून घेणे.
- परिसंवादातील कालबाह्य झालेले विषय बदलून समकालीन विषयांवर चर्चा घडवून आणावी.
- सोशल मीडियावर लिखाण करणाºयांना नव लेखकांना संमेलनात सामावून घेणे.
- संमेलनाला उत्सवी रूप नाही तर सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप देणे.
- अध्यक्षांवर अधिकाधिक जबाबदाºया टाकून त्यांनी वर्षभर नवलेखकांच्या कार्यशाळा व तत्सम साहित्यिक उपक्रम हाती घ्यावेत.
- अध्यक्षांना मिळणाºया रकमेचा आवर्जून हिशोब द्यावा. पारित केलेल्या ठरावांचा पाठपुरावा करून पूर्णत्वास न्यावेत.

Web Title: Literature meet should not be like engagement; The views of dignitaries on the backdrop of the literature conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.