‘प्रतिसाद’ला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:03 AM2017-11-01T01:03:59+5:302017-11-01T01:04:04+5:30
महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या ‘प्रतिसाद’ अॅपबाबत मात्र अनेक महिला व तरुणी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सध्याचा जमाना स्मार्टफोनचा आहे. कामगार लोकांकडेही हल्ली स्मार्टफोन पाहायला मिळतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तर स्मार्टफोनची प्रचंड ‘के्रझ’ आहे. ‘लेटेस्ट अॅप’ कोणते, हे ‘सर्च’ करून ते डाऊनलोड करण्यासाठी धडपडणाºया तरुणींची आणि महिलांचीही कमी नाही; मात्र असे असताना महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या ‘प्रतिसाद’ अॅपबाबत मात्र अनेक महिला व तरुणी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून या अॅपची निर्मिती करण्यात आली असली तरी अडचणीत सापडलेल्या प्रत्येकालाच पोलिसांची तात्काळ मदत मिळावी, यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे.
दीड वर्षापासून हे अॅप अस्तित्वात असूनही या अॅपबाबत मात्र बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच माहिती असल्याचे दिसून आले.
संकटप्रसंगी या अॅपद्वारे जर कोणी पोलिसांना मदत मागितली तर त्या व्यक्तीचा पत्ता पोलिसांना ट्रेस होऊ शकतो आणि सात मिनिटांच्या आत त्या व्यक्तीला पोलिसांची मदत मिळू शकते, तसेच संकटग्रस्त व्यक्तीला जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ताही त्याद्वारे कळू शकतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या फोनवर इंटरनेट असणे आवश्यक असते.
या अॅपचा उपयोग करून आतापर्यंत शहरातील किती व्यक्तींनी मदत मागितली, असे विचारले असता, संबंधित पोलीस अधिका-यांनी हा आकडा अत्यल्प असल्याचे सांगितले.
अधिका-यांच्या मते अॅपचा उपयोग करण्यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध असणारा स्मार्टफोन असणे आवश्यक असल्यामुळे अनेक जणी अॅप डाऊनलोड करीत नाहीत; मात्र अनेक तरुणींना हे अॅप अस्तित्वात आहे हेच माहीत नाही. यावरूनच अॅपबाबत जनजागृती करण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून
येते.