‘माय-बापांसाठी थोडेसे काही’; विभागीय प्रशासन ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी देणार सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 01:47 PM2021-08-26T13:47:23+5:302021-08-26T13:49:46+5:30
मराठवाड्यात ‘माय-बापासाठी थोडेसे काही’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात लोकसंख्येच्या १५ टक्क्यांच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील बहुतांश ज्येष्ठांचे कोरोना काळात प्रचंड हाल झाले. या नागरिकांसाठी मराठवाड्यात ‘माय-बापासाठी थोडेसे काही’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे. ज्येष्ठांसाठी सुविधांसह ग्रामपंचायतनिहाय विरंगुळ्याची ठिकाणे तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
ज्येष्ठांना अनेकदा घरातील अडगळ म्हणूनही पाहिले जाते. पाल्यांकडून त्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. संपत्ती, जमिनीच्या वाटण्या केल्यानंतर ज्येष्ठांचे प्रचंड हाल होत असल्याने अनेक नागरिक विभागीय प्रशासनापर्यंत येत आहेत. कोरोना काळात अशा तक्रारींचा आकडा मोठा होता. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेंकर यांनी हा उपक्रम हाती घेण्याचे नियोजन काही महिन्यांपूर्वी केले असून त्याला मूर्त रूप येत आहे.
ज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी ग्रामीण भागात कुठेही जागा मिळत नाही. कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. गावात विरंगुळ्याचे त्यांना हक्काचे ठिकाण नाही. त्यामुळे एकत्र येऊन एकमेकांचे सुखदु:ख जाणून घ्यावे. यासाठी एका छोटेखानी सभागृहाच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये टीव्ही, वर्तमानपत्रे तसेच मासिकांची आणि पुस्तकांची व्यवस्था करण्यात येईल. बसण्यासाठी खुर्च्या, सतरंजी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. कोरोना काळ असल्यामुळे सुरक्षित अंतर राखता येईल, अशा पध्दतीने त्या सभागृहात ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था असेल. यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण
या उपक्रमाचे प्रमुख उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी सांगितले, मराठवाड्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आशा वर्करच्या माध्यमातून ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये त्यांना कुठल्या सुविधा गरजेच्या आहेत याची माहिती घेण्यात येत आहे. काही ठिकाणी सभागृहाचे काम करण्यात येत आहे. जुन्या सभागृहाची दुरुस्ती करण्यात येत असून काही ठिकाणी या विरंगुळा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
वृध्दापकाळ तणावमुक्त करण्याचा प्रयत्न
आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले, या अभियानाच्या माध्यमातून मेडिकल शिबिर घेऊन ज्येष्ठांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. या सर्वेक्षणात ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांच्या काय अडचणी आहेत, हे समोर येईल. वृद्धापकाळ सुसह्य व तणावमुक्त करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. त्यासाठी घाटीच्या जिरियाट्रिक विभागाची मदत घेतली जात आहे.