राहायला औरंगाबादेत, नोकरी ७० किलोमीटरवर; रोज अपडाऊन करणाऱ्या शिक्षकाच्या घरात चोरी
By राम शिनगारे | Published: September 19, 2022 06:04 PM2022-09-19T18:04:31+5:302022-09-19T18:04:58+5:30
शिक्षकाची पत्नी गर्भवती असल्याने माहेरी गेली होती, त्यामुळे घराला कुलूप होते
औरंगाबाद : पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानंतर शिक्षक पती घर बंद करुन मुळ गावी गेले. मागील सात दिवसांपासून बंद असलेले घर चोरट्यांनी फोडून १ लाख ७६ हजार १०० रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. विशेष म्हणजे घरी चोरी झालेले शिक्षक ७० किलोमिटर अंतरावर असलेल्या नोकरीच्या गावात अपडाऊन करीत असल्याचेही यातून स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय बाबुराव राऊत (३४, रा. अशोकनगर, हर्सुल. मुळ गाव ढाकलगाव, जि. जालना) हे जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथील जि.प. शाळेत शिक्षक आहेत. त्यांची पत्नी रेणुका घाटीत परिचारीका आहेत. दोन आठवड्यापुर्वी त्या बाळंतपणासाठी माहेरी गेल्या आहेत. शिक्षक संजय यांनी १२ सप्टेंबरला घराला कुलूप लावून वडीगोद्री येथे शाळेत गेले. घरी पत्नी नसल्यामुळे ते वडीग्रोदीपासून जवळच असलेल्या ढाकलगाव या मूळ गावाहून ते शाळेत अपडाऊन करीत होते. त्याकाळात औरंगाबादेतील घर बंद होते.
रविवारी सकाळी ते हर्सूल येथील घरी आले. तेव्हा पहिल्या मजल्यावरील घराचा दरवाजा अर्धवट उघडलेला होता. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना बेडरुममधील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटातील सोन्याचे दागिनेही लंपास झाले होते. त्यात सहा ग्रॅमच्या रिंग, १२ ग्रॅमचे मिनी गंठण, मंगळसूत्र, सोन्याचे मनी, बाळ्या, पेंडॉल, झुमे, चांदीचे पैंजन, जोडवे असा एकूण १ लाख ७६ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर आले. त्यांनी घटनेची माहिती हर्सूल पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक रफिक शेख करीत आहेत.
राहायला औरंगाबादेत, नोकरी वडिगोद्रीत
संजय राऊत हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे जि.प. शाळेत शिक्षक आहेत. त्यांचे मुळ गाव ढाकलगाव तेथून जवळच आहे. तरीही राऊत हे ७० किलोमिटरही अधिक अंतर असलेल्या औरंगाबाद शहरातून वडीगोद्री येथे अपडाऊन करीत असल्याचे घटनेमुळे समोर आले. ज्या घरात चोरी झाली तेथे तीन महिन्यांपूर्वीच राऊत कुटुंबासह राहण्यास आले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा राज्यात चर्चेत आला होता हे विशेष.