शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण न करता थेट शोध
By Admin | Published: June 22, 2017 11:20 PM2017-06-22T23:20:28+5:302017-06-22T23:24:05+5:30
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून जोरात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून जोरात सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आता शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांचे आता सर्वेक्षण न करता त्यांचा शोध घेऊन त्यांना वयोगटानुसार तत्काळ शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे.
शिक्षणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे. परंतु शाळाबाह्य मुलांची आकडेवारी निश्चित करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शाळेत दाखल करावे लागणार आहे. शिवाय या मुलांची सरल प्रणालीमध्ये नोंद करण्यात येणार आहे. दिलेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यात १०१ शाळाबाह्य मुले आहेत, तर वसमत ५४, कळमनुरी ८१, औंढानागनाथ ५७ तसेच सर्वाधिक सेनगाव तालुक्यात ४४६ मुला-मुलींची संख्या आहे. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने सध्या शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे. एकही मुलगा शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेत या मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आवडेल असे गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून सध्या नियोजन केले जात आहे. शिवाय बैठका बोलावून संबधित यंत्रणेस मोहीम राबविण्याबाबत माहिती सांगितली जाणार आहे. शिवाय शाळेतील मुलींच्या गळतीकडे विशेष लक्ष दिले जाणार असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे.