औरंगाबाद जिल्ह्यात ३४० मुलांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:58 PM2018-02-25T23:58:16+5:302018-02-25T23:59:00+5:30
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी सन २००८ पासून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. २०१३ साली या तपासणी मोहिमेचे ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ असे नामांतर झाले. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील बालकांची, तर एक वेळेस शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. एप्रिल २०१७ ते जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यातील २,७८० शाळांपैकी २,५८१ शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या ५ लाख १३ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १ लाख ३४८ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले.
याशिवाय जिल्ह्यातील ३,४२७ अंगणवाड्यांपैकी जानेवारीअखेरपर्यंत १,९२५ अंगणवाड्यांमधील ०-६ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ लाख २० हजार ७५ बालकांपैकी १ लाख ५० हजार ८२५ बालकांची आरोग्य तपासणी झाली. किरकोळ आजारी असलेल्या बालकांपैकी २१ हजार ५४ बालकांवर औषधोपचार करण्यात आले.
चालू आर्थिक वर्षातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत ४५ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. अधिक निदान करण्यासाठी या मुलांची टूडी इको तपासणी करण्यात आल्यानंतर ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’च्या माध्यमातून ३२ मुलांपैकी काहींच्या कमलनयन, धूत, एमजीएम हॉस्पिटलमध्ये, तर काहींच्या हृदयावर मुंबई, बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सन २०१३ पासून जानेवारी अखेरपर्यंत ४७८ हृदयरोगाने त्रस्त आढळून आलेल्या मुलांपैकी ३४० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ४ हजार ६६० विद्यार्थ्यांना संदर्भित रुग्णसेवेसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९७७ मुलांवर औषधोपचार करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये ४२ पथके कार्यरत; अंगणवाडी, शाळांमध्ये तपासणी
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड म्हणाले की, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये ४२ पथके तैनात करण्यात आलेली असून, एका पथकात महिला व पुरुष, असे दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन ही पथके विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात.
हृदयरोगाने त्रस्त मुलांचे प्रमाण हे आंतरराष्ट्रीय प्रमाणाएवढेच आहे. एक लाख बालकांमागे किमान १० बालके हृदयरोगाने आजारी असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळून येणारे आरोग्यविषयक दोष शोधून काढणे, विद्यार्थ्यांमधील आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गंभीर आजारी विद्यार्थ्यांना संदर्भसेवा देणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया करणे, हा या आरोग्य तपासणीचा उद्देश आहे.