इतरांचे आयुष्यही व्हावे प्रकाशमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:12 AM2018-06-10T00:12:44+5:302018-06-10T00:16:08+5:30
रक्तदानाइतकेच दृष्टिदान (नेत्रदान) महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते, याचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यातील १४३ लोकांच्या नेत्रदानामुळे १५३ जणांना दृष्टी मिळाली. मृत्यूनंतरही या लोकांनी इतरांच्या नेत्रज्योती प्रज्वलित करून इतरांचे आयुष्य प्रकाशमय केले.
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रक्तदानाइतकेच दृष्टिदान (नेत्रदान) महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते, याचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यातील १४३ लोकांच्या नेत्रदानामुळे १५३ जणांना दृष्टी मिळाली. मृत्यूनंतरही या लोकांनी इतरांच्या नेत्रज्योती प्रज्वलित करून इतरांचे आयुष्य प्रकाशमय केले.
दरवर्षी १० जून हा जागतिक दृष्टिदान दिन म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभागासह सहा ठिकाणी नेत्रपेढी आहेत. या ठिकाणी नेत्रदान, नेत्रसंकलन आणि प्रत्यारोपण होते.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागातर्फे नेत्रपेढींबरोबर समन्वय ठेवून नेत्रदान वाढीसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतात. दृष्टिदानाएवढे मोठे दान नाही. एखाद्या अंधव्यक्तीच्या जीवनात प्रकाश पोहोचवून नेत्ररूपाने आयुष्य उजळविण्याचे कार्य मरणोत्तर पाडता येते. नेत्रदानाबाबत समाजात आजही काही गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे मृत्यूनंतर नेत्रदानामुळे व्यक्ती विदू्रप दिसेल, ही वाटणारी सर्वात मोठी भीती. यामुळे नेत्रदानासाठी स्वेच्छेने येणाऱ्यांची संख्या अगदीच अल्प होती; परंतु गेल्या काही वर्षांत आरोग्य विभागाकडून होत असलेल्या जागृतीमुळे नेत्रदानाचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे.
सहा नेत्रपेढींमध्ये गेल्या १४ महिन्यांत १४३ व्यक्तींचे मरणोत्तर २८६ नेत्रसंकलन करण्यात आले. संकलन झालेल्या नेत्रांच्या प्रत्यारोपणाने १५३ जणांना दृष्टी प्राप्त झाली. आजारपणासह विविध कारणांमुळे संकलित केलेल्या अनेक नेत्रांचे प्रत्यारोपण अशक्य असते. अशी नेत्र संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे दृष्टी देण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी हातभार लावण्याचे कार्य नेत्रदानाच्या माध्यमातून होत आहे.
नेत्रदानासाठी ही काळजी घ्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचे डोळे सहा तास जिवंत असतात. त्यामुळे हे सहा तास अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नजीकच्या नेत्रपेढीबरोबर संपर्क केल्यानंतर काही मिनिटांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण होते. नेत्रदानासाठी मृत व्यक्तीचे डोळे लगेच बंद करून डोळ्यावर स्वच्छ ओले कापड ठेवले पाहिजे. खोलीमध्ये असलेला पंखा बंद करावा. खोलीमध्ये एसी असेल तर तो सुरू ठेवावा. डोक्याखाली उशी ठेवावी. सहा तासांच्या आत नेत्र काढल्यास ते बुब्बुळरोपण करण्यास उपयोगी पडू शकतात.
देशभरात ६१२ ठिकाणी नेत्रदानाचा प्रचार
नेत्रदान प्रचारक म्हणून ओळखले जाणारे अॅड. किशोर सोनी हे १९९९ पासून नेत्रदानासाठी जनजागृतीचे क ाम करीत आहेत. केवळ औरंगाबाद शहरच नव्हे तर देशभरातील ६१२ ठिकाणी त्यांनी नेत्रदानाचा प्रचार-प्रसार केला आहे. यात्रा असो की उत्सव, त्या ठिकाणी हातात फलक धरून नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याचे कार्य ते अवितरपणे करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेकांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
अॅड. किशोर सोनी म्हणतात, आजघडीला वृद्धांचे नेत्रदान करण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अनेकांचे नेत्र प्रत्यारोपणासाठी योग्य नसतात. त्यामुळे केवळ संशोधनासाठी नेत्रांचा वापर होतो. त्यामुळे सशक्त नेत्र मिळण्याची गरज आहे. त्यासाठी मृत्यू पावणाºया तरुण, प्रौढ व्यक्तींच्या नेत्रदानातही वाढ होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाच्या संकल्पाबरोबर आयुष्यात एका व्यक्तीचे तरी नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.