मार्चनंतर लोडशेडिंगचे चटके
By Admin | Published: March 1, 2016 12:34 AM2016-03-01T00:34:00+5:302016-03-01T00:34:00+5:30
बापू सोळुंके , औरंगाबाद शहर भारनियमनमुक्त करण्यात आलेले आहे. असे असले तरी विविध उपाययोजना केल्यानंतरही वीज गळती (लाईन लॉसेस) कमी होत नाही.
बापू सोळुंके , औरंगाबाद
शहर भारनियमनमुक्त करण्यात आलेले आहे. असे असले तरी विविध उपाययोजना केल्यानंतरही वीज गळती (लाईन लॉसेस) कमी होत नाही. जुन्या शहरातील ४० टक्के फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ६० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस वीज बिलाची थकबाकीही वाढत असून, वसुली पथकावर हल्ले होत असल्याने महावितरणचे अधिकारी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून मार्चनंतर शहरात लोडशेडिंगची शिफारस केली जाणार असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली. यामुळे औरंगाबादकरांचा उन्हाळा असह्य उकाड्यात जाण्याची भीती आहे.
शहरात महावितरणचे २ लाख ६० हजार ९१८ वीज ग्राहक आहेत. यापैकी जुन्या शहराचा भाग असलेल्या विभाग क्रमांक-१ मध्ये १ लाख २२ हजार २४५ तर सिडको, हडको, चिकलठाणा, गारखेडा परिसराचा समावेश असलेल्या विभाग क्रमांक-२ मध्ये १ लाख ३८ हजार ६७३ वीज ग्राहक आहेत. विभाग क्रमांक-१ मध्ये ५० फिडर असून, यापैकी निम्म्या २४ फिडरवर सर्वाधिक वीजचोरी आहे. या फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून सतत विशेष मोहिमा या विभागात राबविण्यात येतात. त्यानंतरही वीज चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. वीजचोरीसोबतच बिल वसुलीही अत्यल्प आहे. या विभागातील अडीच हजार ग्राहकांकडे तब्बल ५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
यासोबतच औरंगाबाद शहर विभाग क्रमांक-२ मधील वीज गळती असलेल्या फिडरची संख्या १० पेक्षा अधिक आहे. असे असले तरी या विभागातील वीज बिलांची थकबाकी मात्र, कमी होत नाही. शहरातील एकूण ८६ पैकी ३२ फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत आहे. ज्या भागात वीजचोरी अधिक आहे, त्या वसाहतीत प्लास्टिक कोटेड वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. काही भागात तर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या. त्यावर सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च केल्यानंतरही वीजचोरी थांबत नाही आणि थकबाकीही वसूल होत नसल्याने भारनियमनाचा पर्याय महावितरणसमोर राहिला आहे.
महावितरणने वीज गळतीच्या प्रमाणावरून लोडशेडिंगचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार औरंगाबादशिवाय अन्य ठिकाणी लोडशेडिंग केली जात आहे. त्यासाठी ई, एफ, जी १, जी २, अशी वर्गवारी केली आहे.
४४२ टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत वीज गळती असलेल्या फिडरला ई गट म्हणून संबोधले जाते. त्या फिडरवर सव्वासहा तास लोडशेडिंग केले जाते. ५० ते ५८ टक्के वीज गळती असलेल्या फिडरचा समावेश एफ गटात आहे.
याविषयी मुख्य अभियंता सतीश चव्हाण म्हणाले की, शहरातील अनेक फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि वसुलीही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही सध्या वीज बिल वसुली आणि वीज गळती रोखण्यास प्राधान्य दिलेले आहे. प्रयत्न करूनही वीज गळती कमी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे लोडशेडिंगच्या पर्यायांचा विचार मार्चनंतर होऊ शकतो. शिवाय आम्ही अन्य पर्यायांचाही विचार करीत आहोत.