हेल्मेट फुटून डोक्याचा झाला चेंदामेंदा; भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार अभियंता जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:05 PM2020-03-21T18:05:23+5:302020-03-21T18:07:16+5:30
भरधाव ट्रक पुढे जात अचानक डावीकडे वळली यामुळे झाला अपघात
औरंगाबाद : भरधाव वाळूच्या ट्रकने दुचाकीवरील निवृत्त अभियंत्याला चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी बायपासवरील वखार महामंडळासमोरील चौकात घडली. मोहमद अब्दुल मोहमद इसाक (६५,रा. हुसेन कॉलनी,पटेलनगर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी मोहमद अब्दुल हे एमआयटीकडून दुचाकीने (एमएच २० डी. यु. ८१५१) घरी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच २० इ.जी. ७११०) पुढे जात अचानक डावे वळण घेतले. यावेळी मोहमद अब्दुल यांच्या दुचाकीला ट्रकचा धक्का लागला व ते खाली पडले. याचवेळी ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने हेल्मेट फुटून गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
डोक्यातील हेल्मेट फुटले
जड वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने हेल्मेटसह त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातानंतर नागरिक तत्काळ मदतीला धावले मात्र मोहमद अब्दुल यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी पळून जाणाऱ्या चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकास ताब्यात घेतले असून, सदर ट्रक देखील ठाण्यात जमा केलेली आहे. शवविच्छेदन आहवालानंतर गुन्हा दाखल होईल, असे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.